बहिणीचे अवशेष उकरून बँकेत नेणाऱ्या भावाची धक्कादायक कृती

 

बँकेकडून वारंवार नकार मिळाल्याने टोकाचा निर्णय
घटनेने स्थानिक प्रशासन आणि नागरिकांमध्ये खळबळ

भाऊ-बहिणीच्या नात्याला पवित्र मानले जाते, मात्र एका घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. बहिणीच्या खात्यातील पैसे काढण्यासाठी एका भावाने अत्यंत टोकाचे पाऊल उचलले. बँकेकडून वारंवार नकार मिळाल्याने त्याने बहिणीचे अवशेष उकरून थेट बँकेत आणले. या कृतीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.


पटना : बिहारमधील एका गावात भावाने आपल्या मृत बहिणीचे अवशेष कबरीतून बाहेर काढून बँकेत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बहिणीच्या खात्यातील पैसे काढण्यासाठी तो सतत बँकेकडे विनंती करत होता, मात्र खातेदार उपस्थित नसल्याचे कारण देत अर्ज फेटाळले जात होते.

माहितीनुसार, दियानाली गावातील जीतू मुंडा याची बहिण कलारा मुंडा हिचे निधन झाले होते. तिच्या खात्यातील रक्कम काढण्यासाठी जीतूने आवश्यक कागदपत्रे दिली होती, तरीही बँकेने परवानगी नाकारली.

यामुळे हताश झालेल्या जीतूने दोन दिवसांपूर्वी बहिणीची कबर उकरून तिचे अवशेष बाहेर काढले आणि ते थेट बँकेसमोर आणून ठेवले. या प्रकारामुळे स्थानिक नागरिक आणि प्रशासन हादरले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर बहिणीचे अवशेष पुन्हा दफन करण्यात आले.

या घटनेनंतर बँकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. गरीब नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी अशी वेळ का येते? असा सवाल उपस्थित केला जात आहे.