कारवांचीवाडी फाटा येथे रस्ता ओलांडणाऱ्या वुध्दाला भरधाव कारची धडक; चालकावर गुन्हा

रत्‍नागिरी ः प्रतिनिधी

रस्ता ओलांडणाऱ्या वुध्दाला भरधाव कारची धडक बसून झालेल्या अपघातात गंभिर जखमी झालेल्या वृध्दाचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकिय रुग्णालयात मृत्‍यू झाला. अपघाताची ही घटना शुक्रवार 1 मे रोजी सायंकाळी 7.30 वा.सुमारास कारवांचीवाडी फाटा येथे घडली.

प्रभाकर शांताराम साळवी (66,रा.रॉयल अपार्टमेंट श्रीनगर खेडशी,रत्‍नागिरी) असे मृत्‍यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे. या अपघात प्रकरणी अभिजित प्रभाकर मोहिते (रा.एमआयडीसी मिरजोळे,रत्‍नागिरी) या कार चालकावर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्‍याच्या विरोधात रुपेश सुधाकर सुर्वे (35,रा.सुयश कॉम्लेक्स मुकादम हॉस्पिटल जवळ खेडशी,रत्‍नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्‍यानुसार, शुक्रवारी सायंकाळी 7.30 वा.सुमारास प्रभाकर साळवी हे कारवांचीवाडी फाटा रस्ता ओलांडून रत्‍नागिरी ते हातखंबा जाणारा रस्ता ओलांडत होते. त्‍यावेळी संशयित कार चालक अभिजित मोहिते हा आपल्या ताब्यातील कार (एमएच-08-बीई-3379) घेउन भरधाव वेगाने त्‍या रस्त्‍याने जात असताना त्‍याच्या कारची धडक प्रभाकर साळवी यांना बसून ते गंभिर जखमी झाले. त्‍यांना तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्‍याठिकाणी उपचार सुरु असताना उपचारांदरम्यान रात्री 9वा.सुमारास त्‍यांचा मृत्‍यू झाला.