सावंतवाडीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन वृद्धांचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह

​सावंतवाडी | प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यात रविवारी दोन अत्यंत हृदयद्रावक घटना उघडकीस आल्या आहेत. तालुक्यातील झिरंग-म्हाडा कॉलनी आणि माजगाव मेटवाडी अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन वृद्धांचा त्यांच्या राहत्या घरात मृत्यू झाल्याचे समोर आले असून, दोन्ही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले आहेत. या घटनांमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

​ ​शहरातील झिरंग म्हाडा कॉलनी येथे सुभाष नारायण नाईक (वय ७९) हे आपल्या पत्नीसह गेल्या दोन वर्षांपासून वास्तव्यास होते. नाईक हे दीर्घकाळापासून आजारी होते, तर त्यांची पत्नी मानसिक रुग्ण असल्याने या कुटुंबाची परिस्थिती बिकट होती. त्यांच्या नाश्त्याची सोय बाहेरून करण्यात येत असे.

​नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी ९:३० च्या सुमारास एक महिला त्यांना नाश्ता देण्यासाठी गेली होती. त्यावेळी घराच्या खिडकीतून अत्यंत उग्र वास येत असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने खिडकीतून डोकावून पाहिले असता, सुभाष नाईक हे जमिनीवर मृतावस्थेत पडलेले दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे आणि हवालदार मंगेश शिंगाडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

​पाच दिवसांपासून संपर्क तुटलेल्या वृद्धाचा बाथरूममध्ये मृत्यू

​दुसरी घटना रविवारी सायंकाळी ४:३० च्या सुमारास माजगाव मेटवाडी येथे उघडकीस आली. येथील रहिवासी चंद्रकांत सिताराम वाडकर (वय ८५) हे गेल्या पाच वर्षांपासून घरात एकटेच राहत होते. त्यांची मुले इन्सुली येथे राहतात. २९ एप्रिल रोजी ते मुलाकडे जाणार होते, मात्र ते पोहोचले नाहीत.

​रविवारी सुट्टी असल्याने मुले घराच्या साफसफाईसाठी माजगाव येथे आली असता, घराचा दरवाजा आतून बंद होता आणि खिडकीतून दुर्गंधी येत होती. संशय आल्याने त्यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने घराचा मागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, वाडकर यांचा मृतदेह बाथरूममध्ये कुजलेल्या स्थितीत आढळला. याप्रकरणी त्यांचा मुलगा गौरव वाडकर यांनी फिर्याद दिली आहे.
​
​या दोन्ही प्रकरणांत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची (ADR) नोंद करण्यात आली आहे. दोन्ही घटनांमध्ये वृद्धांचा मृत्यू होऊन काही दिवस उलटल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. एकाच दिवशी दोन ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूच्या घटना उघडकीस आल्याने सावंतवाडी शहरासह तालुक्यात खळबळ माजली असून, एकाकी राहणाऱ्या वृद्धांच्या सुरक्षिततेचा आणि आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.