पालपेणे येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात साजरा*

भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष श्री. संतोष जैतापकर यांची प्रमुख उपस्थिती

अडूर l वार्ताहर :गुहागर तालुक्यातील पालपेणे येथे नुकतेच ग्रामपंचायत पालपेणे आणि पुणे येथील श्री विश्वासराव थोरसे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गावातील मुख्य रस्त्यालगत सावली निर्माण व्हावी या हेतूने विविध प्रकारची झाडे लावण्यात आली.

कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष श्री. संतोष जैतापकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. मार्गदर्शन करताना त्यांनी पर्यावरण रक्षणाची गरज अधोरेखित करत “एक झाड, एक जीवन” या संदेशावर भर दिला. ग्लोबल वॉर्मिंगसारख्या वाढत्या पर्यावरणीय संकटांची जाणीवही त्यांनी उपस्थितांना करून दिली.

 

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, श्री. जैतापकर यांनी असेही सांगितले की, कोकणातील ग्रामीण भागातूनही आयएएससारखे उच्चपदस्थ अधिकारी घडावेत, यासाठी अभ्यास, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे.

 

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात मा. रघुनाथ घाणेकर (माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य) यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ग्रामपंचायत सदस्य, गावकरी, महिला मंडळ, युवक मंडळ आणि शालेय विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

 

श्री विश्वासराव थोरसे यांच्या पुणे येथील संस्थेच्या वतीने कार्यक्रमासाठी झाडांची सुविधा करण्यात आली. गावाच्या विकासासाठी त्यांचे योगदान आदर्शवत असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

 

यावेळी कृषी सहाय्यक अधिकारी श्रीमती कदम मॅडम, वरदान न्यू इंग्लिश स्कूल पालपेणेचे मुख्याध्यापक पांडुरंग विठ्ठल हासबे, विश्वास सावंत गुरुजी, अशोक पाष्टे गुरुजी, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा पालपेणे नंबर ०२ चे सहाय्यक शिक्षक, ग्रामपंचायत पालपेणेचे उपसरपंच दिलीप पाष्टे, रघुनाथ घाणेकर (सदस्य व माजी उपसरपंच ग्रामपंचायत पालपेणे), सर्व ग्रामपंचायत सदस्य, समाजसेवक उमेश खैर, संतोष मांडवकर व ग्रामस्थ, शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान पर्यावरणप्रेमी नागरिकांचे विशेष सहकार्य लाभले. शेवटी, लावलेल्या झाडांची नियमित देखभाल करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.