केंद्रप्रमुख नंदकुमार चिवेलकर यांचा सेवानिवृत्तीबद्दल आर.सी. काळे माध्यमिक विद्यालयात सत्कार*

 

चिपळूण (प्रतिनिधी ): चिपळूण तालुक्यातील वालोपे केंद्राचे केंद्रप्रमुख नंदकुमार चिवेलकर हे नियत वयोमानानुसार 30 सप्टेंबर रोजी आपल्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल त्यांचा पेढे येथील आर.सी. काळे माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक श्री विनायक माळी यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.

केंद्रप्रमुख नंदकुमार चिवेलकर हे आपल्या सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल त्यांच्या विशेष सत्काराचे आयोजन शाळेत करण्यात आले होते. यावेळी पानकरवाडी शाळेचे मुख्याध्यापक संतोष सुर्वे, विद्यालयाचे मुख्याध्यापक विनायक माळी, पर्यवेक्षक मुरसिद्ध पडवळे यांच्यासह सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी शाळेच्या वतीने केंद्रप्रमुख चिवेलकर यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.प्रारंभी मुख्याध्यापक विनायक माळी यांनी प्रास्ताविक करताना नंदकुमार चिवेलकर सर यांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला. त्यामध्ये त्यांनी चिवेलकर सर यांची शिक्षणाविषयी असलेली आस्था आणि सहकार्याची जाणीव, बांधिलकी या गुणांबाबत विवेचन केले. तसेच श्री संदेश पवार यांनी आपल्या मनोगतात केंद्रप्रमुख चिवेलकर सर यांच्याकडून शाळेला मिळालेल्या सहकार्याचा तसेच वेगवेगळ्या शैक्षणिक कामांच्या अनुभवांचा दाखला दिला.

 

 

केंद्रप्रमुख नंदकुमार चिवेलकर सर यांनी सत्कार स्वीकारताना आपल्या शैक्षणिक कारकिर्दीचा आढावा घेऊन ज्या ज्या शाळांमध्ये काम करण्याची संधी मिळाली , त्या त्या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे आपण काम केले. आणि विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी माझ्याकडून 100% देण्याचा प्रयत्न केला. तसेच केंद्रप्रमुख म्हणूनही शाळांना मार्गदर्शन करतानाच काम करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याचे समाधान वाटते असे सांगितले. शेवटी समन्वयक श्री नितीन रेपाळ यांनी आभार मानून कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली.