मालवण | प्रतिनिधी : पश्चिम बंगाल व आसाम राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजप च्या दणदणीत विजया नंतर मालवण तालुका भाजप कार्यालयात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. विजयी घोषणाबाजी करत आणि फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला. भाजपने पश्चिम बंगाल व आसाम मध्ये मिळविलेला विजय हा राष्ट्रविरोधी शक्तींविरोधात मिळविलेला मोठा विजय असून भाजपचा विजय म्हणजेच राष्ट्र प्रथम यां विचारसरणीचा विजय आहे, असे भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी विलास हडकर यांनी सांगितले.
यावेळी विलास हडकर, नगरसेवक रविकिरण तोरसकर, मंदार केणी, ललित चव्हाण, महिला बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, महानंदा खानोलकर, भाई कासवकर, सन्मेष परब, पंकज सादये, शिल्पा खोत, महिमा मयेकर, मनोज मेथर, पंकज पेडणेकर, साईनाथ वाघ आदी व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी विलास हडकर म्हणाले, देशभरात झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपने पश्चिम बंगाल व आसाम केरळ, पाँडीन्चेरी या राज्यांमधील निवडणूकांचे जे निकाल आहेत हे सर्व निकाल भाजप नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना अपेक्षित असलेले निकाल आहेत. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये भाजपला विजय मिळाल्याने ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे पानीपत होत चालले आहे. या माध्यमातून देशातील नागरीक जागृत होताना आपल्याला दिसत आहेत. आज देशातील ७० टक्के भुभागामध्ये भाजप पक्षाचे वर्चस्व आहे. पुढच्या निवडणूकीमध्ये १०० टक्के भुभागावर भाजपचे वर्चस्व असेल. देशामध्ये राहून देशातील काही नागरीक राष्ट्र विरोधी कार्यामध्ये सहभागी होतात अशांना आता लक्ष्य करून त्यांच्या विचारसरणीमध्ये बदल करण्याचे प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.
यावेळी शिल्पा खोत म्हणाल्या, पश्चिम बंगालमध्ये भाजपने प्रथमच विजय संपादन केला आहे. पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री व त्यांचे ज्याप्रमाणे आचार विचार होते, कशाप्रकारे त्या राज्याची वाटचाल सुरू होती ही एक खंत होती. आज खऱ्या अर्थाने वाईट प्रवृत्तींना ठेचले गेले आहे. आता हे राज्य विकासाच्या मार्गावर लक्ष केंद्रीत करत आहे. या विजयात संघर्ष आहे त्याग आहे, त्यात अनेकांचे जीवही गेले आहेत. कार्यकर्त्यांनी आज रक्ताचे पाणी केल्यामुळे भाजपने विजय खेचून आणला आहे, असे खोत म्हणाल्या.












