माडखोल येथील दुर्दैवी घटना
अन्य एक गंभीर जखमी
माडखोल । प्रतिनिधी :
गांजिल माशांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील माडखोल येथील रहिवासी आनंद हेमा म्हालटकर (वय ५३) यांचा शुक्रवारी दुपारी मृत्यू उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर या घटनेत स्वप्निल संतोष लातये (वय ३१, रा. नमसवाडी) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सावंतवाडीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गुरुवारी दुपारी स्वप्निल लातये आणि आनंद म्हालटकर हे दोघे दुचाकीवरून कारिवडे गवळीवाडी येथे जात होते. त्यांच्या पुढे बांबू भरलेला कॅन्टर जात असताना, कॅन्टरचा वरचा भाग झाडाच्या फांदीला लागल्याने रस्त्याकडच्या झाडावरील गांजिल माशांचे पोळे थेट त्यांच्या दुचाकीवर कोसळले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे दोघेही मोटारसायकलवरून खाली कोसळले आणि माशांनी त्यांच्यावर बेछूट हल्ला केला. याचवेळी त्यांच्या पाठोपाठ येणारे कारिवडे येथील शिवसेना उपविभाग प्रमुख रवी परब यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रसंगावधान राखून दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला.
या हल्ल्यात रवी परब, सुभाष परब आणि अन्य एक व्यक्तीही जखमी झाले. घटनेनंतर तात्काळ दोन्ही जखमींना उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना आनंद म्हालटकर यांची प्रकृती खालावल्याने त्यांचे निधन झाले, तर अधिक उपचारासाठी स्वप्निल लातये यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती सुधारत आहे.
आनंद म्हालटकर यांची घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असून ते मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. काही काळापूर्वी आईचे छत्र हरपल्यानंतर आता वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांच्या तिन्ही मुलींचे पितृछत्रही हरपले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे माडखोल परिसरात हळहळ व्यक्त होत असून म्हालटकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शुक्रवारी सायंकाळी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, तीन मुली, एक भाऊ, बहिणी आणि भावजय असा परिवार आहे.













