‘सैनिक हो तुमच्यासाठी’ मध्ये माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी यांना विविध दाखल्यांचे वाटप

रत्नागिरी : महसूल सप्ताहांतर्गत सैनिक हो तुमच्या या कार्यक्रमात जिल्ह्यातील माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी यांना महसूल विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
डी.जे. सामंत महाविदयालय येथे “सैनिक हो तुमच्यासाठी ” कार्यक्रमातंर्गत आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये माजी सैनिक, वीर माता, नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत कार्य करणा-या संस्था व व्यक्ती, नैसर्गिक आपत्तीमधील आदग्रस्तांना लाभ देणे, माजी सैनिक यांना मालमत्ता करातून सूट देणे, विविध प्रकारचे दाखले वितरण, त्यासाठी लागणारे अर्ज वाटप, पीकविमा लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप, अनुकंपा तत्वावर नवनियुक्त कर्मचाऱ्यांना आदेशाचे वितरण यासारखे विविध उपक्रम राबविण्यात आले.

या कार्यक्रमांतर्गत ३३ माजी सैनिक, वीरपत्नी यांचा सत्कार करण्यात आला. १२ माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देणे, १३ नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्य करणाऱ्या संस्था व व्यक्ती यांचा सन्मान करण्यात आला. ५ नैसर्गिक आपत्तीमधील आपदग्रस्तांना लाभ देण्यात आला. ५६ जणांना नवीन शिधापत्रिका व ५३ जणांचे रेशनकार्डवरुन नाव कमी करण्यात आले. ७५ विविध प्रकारचे दाखले वितरण अर्ज वाटप अर्ज भरणे, ५ पीकविमा लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप,१३ आधारकार्ड अपडेट करण्यात आले. १४८ जणांचे नवीन मतदार नोंदणी अर्ज भरून घेण्यात आले. कार्यक्रमाच्यावेळी विविध प्रकारचे दाखले, शिधापत्रिका, पिकविमा योजना, मतदार नोंदणीबाबत माहिती देणारे स्टॉल लावण्यात आले होते. विभागीय आयुक्त कोकण विभाग डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते तलाठी संवर्गातील नवीन अनुकंपा तत्त्वावर नवनियुक्त ५ कर्मचाऱ्यांना आदेश वितरित करण्यात आले.

खेड तालुक्यात उपविभागीय अधिकारी व तहसिलदार खेड यांनी वैश्यभवन येथे सैनिक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महसूल विभागामार्फत ई-पीक पहाणी, सलोखा योजना, निवडणूक कार्ड आधार जोडणी, पुरवठा सेवा, आपली चावडी व आरोग्य कक्ष अशा विविध योजनांची माहिती व सेवा माजी सैनिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली होती तसेच निवडणूक सेल्फी पॉइंटचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाला खेड तालुक्यातील वीरपत्नी, वीरमाता, माजी सैनिक असे एकूण ३५० मान्यवर उपस्थित होते. १६ वीर पत्नी व वीर माता यांचा सन्मान करण्यात आला.
विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी एम.देवेंद्रर सिंह, मुख्य कार्यकारी आधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी राजापूर तालुका येथे भेट देवून महसूल सप्ताहाबाबत आढावा घेवून मार्गदर्शन केले. सैनिक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमांतर्गत (Format T1 ) सैनिक संबंधित दाखले ४४, घरपट्टी माफ करण्यासाठी प्राप्त अर्ज ६७, जमीन मागणी २ प्रकरणे प्राप्त झाली ९ लाख ४५ हजार २०० रुपये ध्वजदिन निधी संकलित करण्यात आला.