संगमेश्वर:
संगमेश्वर तालुक्यातील मांजरे-कोपरखरी परिसरात महावितरणच्या रोहित्राची (ट्रान्सफॉर्मर) तोडफोड करून त्यातील महागड्या तांब्याच्या तारांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मांजरे येथील कोपरखरी भागात महावितरण कंपनीचे २५ के.व्ही.ए. क्षमतेचे एक नादुरुस्त रोहित्र (क्र. डी.टी.सी. ४१९००२६) बसवण्यात आले होते. दि. २४ नोव्हेंबर २०२४ ते दि. ४ मे २०२६ या कालावधीत अज्ञात चोरट्याने या रोहित्राची तोडफोड केली. चोरट्याने महावितरणची कोणतीही संमती न घेता, लबाडीच्या इराद्याने या यंत्रणेतील सुमारे ३५ किलो वजनाची कॉपर (तांब्याची) वाइंडिंग चोरून नेली.
या चोरीच्या घटनेत महावितरणचे अंदाजे ३५,००० रुपये किमतीचे नुकसान झाले आहे. चोरट्याने केवळ तांब्याच्या तारांवर डल्ला मारल्याने महावितरणच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.
महावितरण कंपनीच्या जाकादेवी शाखेचे प्रधान तंत्रज्ञ स्वप्निल दिलीप नाके (वय ३८) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. नाके हे मेढे ते जाकादेवी आणि उक्षी परिसरातील विद्युत रोहित्रांच्या देखभाल व दुरुस्तीचे काम पाहतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संगमेश्वर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास संगमेश्वर पोलीस करत असून, ग्रामीण भागात अशा प्रकारे रोहित्रांची चोरी करणाऱ्या टोळीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.












