खेड (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील सुसेरी नं. १ येथे आयोजित करण्यात आलेला श्री सत्यनारायण महापूजा व सांस्कृतिक कार्यक्रम शनिवारी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद लुटला.
सायंकाळी आयोजित श्री सत्यनारायण महापूजेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विधिवत पूजनानंतर उपस्थितांना तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला होता.
यानंतर रात्री सादर करण्यात आलेल्या नमन व दशावतार नाट्यप्रयोगाने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवली. आई वाघजाई कलामंच, नांदगाव यांच्या कलाकारांनी “कृष्णाने लावला वेध राधे मनात” या नाट्यप्रयोगातून प्रेक्षकांची मने जिंकली. “गवळण – कालियावध” यांसारख्या पारंपरिक सादरीकरणांनी उपस्थितांची दाद मिळवली. कलाकारांच्या अभिनय, वेशभूषा आणि नृत्याविष्काराने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री खेमनाथ मित्र मंडळ व महिला मंडळ, सुसेरी नं. १ यांच्या वतीने करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी आयोजकांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांकडून आयोजकांचे कौतुक करण्यात आले.












