रत्नागिरी: प्रतिनिधी
शहरातील कोकण नगर परिसरात असलेल्या अनधिकृत बांधकामांविरोधात रत्नागिरी नगर परिषदेने आज अखेर आक्रमक पवित्रा घेत मोठी कारवाई केली. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या या भागातील तब्बल ८० अनधिकृत गाळे आज नगर परिषदेच्या पथकाने जमीनदोस्त केले. या धडक कारवाईमुळे शहरात अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या गाळ्यांवर साधारण दोन महिन्यांपूर्वीच कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, त्या वेळी गाळेधारकांनी प्रशासनाकडे काही कालावधीची मुदत मागून घेतली होती. प्रशासनाने मानवतावादी दृष्टिकोनातून ही मुदत मान्य केली होती, मात्र ही मुदत संपल्यानंतरही संबंधित गाळेधारकांनी स्वतःहून अतिक्रमणे हटवली नाहीत.
वारंवार सूचना देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने, आज बुधवारी सकाळी नगर परिषदेचे पथक पोलीस बंदोबस्तासह घटनास्थळी दाखल झाले. कोणतीही सवलत न देता प्रशासनाने थेट बुलडोझरच्या सहाय्याने हे ८० गाळे पाडण्यास सुरुवात केली. या कारवाईदरम्यान परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते, परंतु नगर परिषदेने आपला पवित्रा कायम ठेवत अनधिकृत बांधकामे पूर्णपणे हटवली. शहराचे नियोजन आणि रस्ते मोकळे करण्यासाठी अशाच प्रकारची कठोर पावले उचलली जातील, असे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
Home महत्वाच्या बातम्या BIG BREAKING: रत्नागिरीत नगर परिषदेचा मोठा दणका; कोकण नगरमधील ८० अनधिकृत गाळ्यांवर...












