सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे येथे AICTE मान्यताप्राप्त बीएमएस (BMS) अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांची पसंती

१२ वी नंतर विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी, प्रवेशासाठी CET अनिवार्य
यावर्षी देखील पुन्हा CET होणार; सायन्स (PCM/PCB) CET सुद्धा वैध
चिपळूण (प्रतिनिधी) : व्यवस्थापन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सह्याद्री शिक्षण संस्था संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय सावर्डे येथे बीएमएस (Bachelor of Management Studies) हा पदवी अभ्यासक्रम उपलब्ध असून चिपळूण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी ठरत आहे. मुंबई युनिव्हर्सिटी अंतर्गत बीएमएस (Bachelor of Management Studies) हा व्यवस्थापन क्षेत्रातील लोकप्रिय पदवी अभ्यासक्रम सध्या विद्यार्थ्यांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.
दोन वर्षांपूर्वी या अभ्यासक्रमाला All India Council for Technical Education (AICTE) ची मान्यता मिळाल्यानंतर बीएमएस प्रवेशासाठी CET (Common Entrance Test) देणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे देशस्तरावर या अभ्यासक्रमाला महत्व प्राप्त झाले आहे. बीएमएससाठी स्वतंत्र स्पेशल CET परीक्षा घेतली जाते. मात्र बारावी उत्तीर्ण झालेल्या अनेक विद्यार्थ्यांना या स्पेशल CET विषयी पुरेशी माहिती नसल्याचे दिसून येते. महत्त्वाचे म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, MCVC, इलेक्ट्रॉनिक्स अशा कोणत्याही शाखेतील विद्यार्थी बीएमएससाठी पात्र आहेत. दरम्यान, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही दुसऱ्या CET परीक्षेची शक्यता वर्तवली जात असून त्याबाबत सकारात्मक संकेत मिळत आहेत. त्यामुळे पहिल्या CET मध्ये संधी न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही आणखी एक मोठी संधी ठरणार आहे. यंदाची आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी दिली जाणारी स्वतंत्र CET देखील बीएमएस प्रवेशासाठी वैध मानण्यात आली आहे. त्यामुळे सायन्स विद्यार्थ्यांसाठी बीएमएस हा पर्याय अधिक सुकर खुला झाला आहे. विशेष म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात AICTE मान्यताप्राप्त बीएमएस अभ्यासक्रम फक्त खेड व चिपळूण तालुक्यातच उपलब्ध असून तो सह्याद्री शिक्षण संस्था संचलित सावर्डे येथील महाविद्यालयात गेले 6 वर्षे यशस्वीपणे सुरूआहे. त्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांसाठी ही खऱ्या अर्थाने सुवर्णसंधी ठरत आहे. सह्याद्री शिक्षण संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, अनुभवी प्राध्यापक, आधुनिक सुविधा, नोकरी मेळावा तसेच विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ दिला जात आहे. व्यवस्थापन क्षेत्रात एमबीए करण्यापूर्वीची ही महत्त्वाची पदवी मानली जाते.
देशातील इतर विद्यापीठांमध्ये हा अभ्यासक्रम बीबीए (BBA) म्हणून ओळखला जातो, तर मुंबई विद्यापीठात तो बीएमएस (BMS) या नावाने प्रसिद्ध आहे. तज्ज्ञांच्या मते, व्यवस्थापन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी बीएमएस हा उत्तम पर्याय म्हणून निवडावा. मात्र यासाठी CET परीक्षा देणे अनिवार्य असल्याने इच्छुक विद्यार्थ्यांनी वेळेत नोंदणी करून सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे येथे संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयतर्फे करण्यात आले आहे.