चिपळूण (प्रतिनिधी) : शहरातील शिवाजीनगर परिसरात असलेल्या सीएनजी पंपावरील कॉम्प्रेसरमुळे होणाऱ्या तीव्र आवाज प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, नगरसेविका अंजली सतीश कदम व नगरसेवक शशिकांत मोदी यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधित महानगर गॅस व्यवस्थापनाला धारेवर धरत तातडीने कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शिवाजीनगर येथील महानगर गॅस पंपस्टेशनलगतच कॉम्प्रेसर मशीन बसविण्यात आले आहे. या मशीनच्या शेजारीच प्रथमेश अपार्टमेंटचे फेज १, २ व ३ असे सुमारे ३०० नागरिकांचे निवासी संकुल आहे. गेल्या अडीच वर्षांपासून येथील रहिवाशांना या कॉम्प्रेसरमधून होणाऱ्या प्रचंड आवाजाचा त्रास सहन करावा लागत आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच याचा परिणाम जाणवत असल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र, येत्या 15 दिवसांत समाधानकारक तोडगा न निघाल्यास नागरिकांसह महानगर गॅस कार्यालयासमोर तसेच संबंधित पंपावर आंदोलन व उपोषण छेडण्याचा इशारा नगरसेविका अंजली कदम व नगरसेवक शशिकांत मोदी यांनी दिला आहे. या वेळी पत्रकार सतीश कदम तसेच प्रथमेश अपार्टमेंटचे पदाधिकारी उपस्थित होते. या प्रकरणामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी होत आहे.












