झाडांवरील फळांवरही सरकारचा हक्क; नियम मोडल्यास मोठा दंड
पर्यटकांसाठी जैवसुरक्षा आणि सार्वजनिक संपत्तीचे कठोर कायदे
सिंगापूरमध्ये झाडावरून पडलेला आंबा उचलणे किंवा तोडणेही कायदेशीर परवानगीशिवाय गुन्हा मानला जाऊ शकतो. देशातील कठोर पर्यावरण आणि सार्वजनिक संपत्ती संरक्षण कायद्यांनुसार सरकारी जमिनीवरील झाडे आणि त्यांची फळे सरकारच्या मालकीची असतात. त्यामुळे परवानगीशिवाय फळे गोळा केल्यास मोठा दंड किंवा तुरुंगवासही होऊ शकतो. पर्यटकांनी या नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा अनावश्यक कायदेशीर अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
सिंगापूर : सिंगापूर हा आपल्या कडक कायदे आणि स्वच्छतेसाठी प्रसिद्ध देश आहे. येथे केवळ च्युइंगम किंवा ड्युरियनवरच नव्हे, तर झाडांवरील फळांबाबतही कठोर नियम लागू आहेत.
राष्ट्रीय विकास मंत्रालय आणि NParks यांच्या नियमानुसार सरकारी जमिनीवरील झाडे आणि त्यांची फळे सरकारच्या मालकीची मानली जातात. त्यामुळे झाडावरून फळ तोडणे किंवा जमिनीवर पडलेले फळ उचलणे देखील नियमभंग ठरू शकतो.
परवानगीशिवाय असे केल्यास S$5,000 (सुमारे ₹3.5 लाख) पर्यंत दंड होऊ शकतो. तर संरक्षित क्षेत्रात हा दंड S$50,000 (सुमारे ₹12.5 लाख) पर्यंत जाऊ शकतो आणि काही प्रकरणांमध्ये 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवासही होऊ शकतो.
या नियमांचा उद्देश पर्यावरण संरक्षण, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण आणि जैवसुरक्षा सुनिश्चित करणे हा आहे. त्यामुळे फळे किंवा झाडांशी संबंधित कोणतीही कृती करण्यापूर्वी नियमांची माहिती घेणे आवश्यक आहे.
सिंगापूरमध्ये पर्यटकांना सल्ला दिला जातो की, झाडांवरून फळे तोडू नयेत, पडलेली फळे उचलू नयेत आणि झाडांवर चढण्याचा प्रयत्न करू नये. नियमांचे पालन न केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात.










