देवी माऊली वर्धापन दिन सोहळा उत्साहात
फिरत्या रंगमंचावरील प्रयोगाने वेधले लक्ष
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील मडूरा येथील ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वर्धापन दिन सोहळा मंगळवारी अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला. या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या ‘संगीत अमृत मोहिनी’ या पौराणिक नाटकाने उपस्थित नाट्यरसिकांची मने जिंकली. विशेष म्हणजे, मडूरा परिसराच्या इतिहासात प्रथमच ‘फिरत्या रंगमंचावर’ हा प्रयोग सादर करून स्थानिक कलाकारांनी आपली चुणूक दाखवून दिली.
वर्धापन दिनानिमित्त सकाळी देवीची षोडशोपचार पूजा आणि श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी आरतीनंतर तीर्थप्रसाद आणि महाप्रसादाचा कार्यक्रम झाला, ज्याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. देवीच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
श्री देव राष्ट्रोळी नाट्यमंडळ, मडूरा (रेडकरवाडी) यांच्या वतीने ‘संगीत अमृत मोहिनी’ हे तीन अंकी महान पौराणिक नाटक सादर करण्यात आले. यशवंत रांजणकर लिखित या नाटकाचे दिग्दर्शन गोव्यातील प्रसिद्ध दिग्दर्शक निलेश महाले यांनी केले होते. कै. पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या मधुर संगीताने सजलेल्या या नाटकाला निलेश मेस्त्री यांनी ऑर्गनवर तर नीरज भोसले यांनी तबल्यावर समर्थ साथ दिली.
नाटकातील प्रमुख भूमिकांमध्ये प्रवीण परब (शंकर), सूरज मोरजकर (विष्णू), सागर मोरजकर (भस्मासूर), नारायण मोरजकर (नारद), शारदा शेटकर (पार्वती) आणि निधी किडजी (मोहिनी) यांनी आपल्या अभिनयाने पात्रांना जिवंत केले. याशिवाय लक्ष्मण परब (इंद्र), अक्षय माधव (किर्मीर), संजीव परब (अकंध), राजेश मोरजकर (नंदी), यथार्थ पंडीत (ऋषी) तसेच सहदेव परब आणि सुशांत मोरजकर यांनीही आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला.
या प्रयोगासाठी गुरुप्रसाद रंगमंच (कासारपाल) यांचे नेपथ्य आणि निलेश नाईक यांची प्रकाश योजना अत्यंत प्रभावी ठरली. गुरुवर्य कै. दिगंबर उर्फ बाळू गाड यांच्या पुण्यस्मरणार्थ सादर करण्यात आलेल्या या प्रयोगासाठी श्री माऊली-शांतादुर्गा देवस्थान (वारखंड) आणि स्थानिक ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.
रात्रभर चाललेल्या या नाट्य प्रयोगाला मडूरा परिसरातील रसिक प्रेक्षकांनी अलोट गर्दी केली होती. स्थानिक कलाकारांनी घेतलेल्या कष्टांचे आणि फिरत्या रंगमंचाच्या अभिनव प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे.











