सरपंच व उपसरपंच मनमानी कारभार करत असल्याचा केला आहे आरोप
वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण ग्रामपंचायत मध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली असून भूकंप घडला आहे. या ग्रामपंचायत मधील ११ सदस्यांपैकी तब्बल ७ सदस्यांनी आज ६ मे रोजी आपल्या सदस्य पदाचे राजीनामे सरपंच यांच्या कडे सादर केले. सरपंच व उपसरपंच यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचे या राजीनाम्यामध्ये म्हटले आहे. या घटनेमुळे वेंगुर्ले तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
राजीनामा दिलेल्या सदस्यांमध्ये अविनाश अंकुश खोत खवणे वॉर्ड क्रमांक १, प्राजक्ता प्रवीण सारंग खवणे वॉर्ड क्र.१, सिया सिद्धेश मार्गी, मळई वॉर्ड क्र.२, सुषमा सुधाकर म्हापणकर म्हापण, वॉर्ड क्रमांक ३,प्रशांती प्रशांत कोनकर म्हापण वॉर्ड क्रमांक ३, गुरुप्रसाद भगवान चव्हाण म्हापण वॉर्ड क्रमांक १ आणि अभय (बापू) गंगाधर ठाकूर म्हापण या सात ग्रामपंचायत सदस्य यांचा समावेश आहे.
ग्रामपंचायत मध्ये अद्यापपर्यंत झालेल्या कार्यकाळामध्ये असे निदर्शनास आले की, म्हापण गावचे सरपंच व उपसरपंच हे मनमनी कारभार करीत असून कुठल्याही ग्रामपंचायत सदस्याला विश्वासात घेत नाहीत. मासिक सभेत योग्य तो ठराव न घेता स्वतःच निर्णय घेऊन चुकीच्या पध्दतीने कामकाज करीत आहेत. सरपंच आणि उपसरपंच स्वतःची मनमानी व अरेरावी करुन ग्रामपंचायतीमध्ये बेकायदेशीर व अनधिकृत कामे करीत आहेत. हे मान्य नसल्यामुळे आपण आज ६ मे रोजी २०२६ ग्रामपंचायत सदस्य पदाचा स्वखुशीने राजीनाम देत आहे. तरी तो स्विकारावा असे सर्व सदस्यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. आपल्या सदस्य पदाचा राजीनामा मंजूर करण्यात यावा अशी मागणी ही या सदस्यांनी केली आहे. त्यामुळे पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.











