वेंगुर्ले : प्रतिनिधी
श्री सरस्वती विद्यालय आरवली-टांक या विद्यालयात सन २०१२-१३ बॅच मधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेशी असलेले ऋणानुबंध जपत शाळेच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले.
यावेळी माजी विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे ₹४२,५०० किमतीच्या विविध वस्तू शाळेला भेट दिल्या. यामध्ये २ टेबल फॅन व ५ व्हॉल फॅन यांचा समावेश आहे.
हा मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी माजी विद्यार्थी सर्वेश बागकर यांनी विद्यार्थ्यांना पेनचे वाटप केले. विद्यार्थ्यांसाठी माजी विद्यार्थ्यांतर्फे खाऊचे वाटप करण्यात आली होती.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. श्रद्धा नाईक यांनी प्रास्ताविकातून माजी विद्यार्थ्यांचे शाळेशी असलेले ऋणानुबंध आणि विद्यार्थ्यांप्रती असलेला जिव्हाळा अत्यंत भावपूर्ण शब्दांत व्यक्त केला. “माजी विद्यार्थी ही शाळेची खरी संपत्ती असून, शाळेतून बाहेर पडल्यानंतरही शाळेशी असलेले नाते कायम जपले जाते,” या भावनेतून त्यांनी माजी विद्यार्थ्यांच्या योगदानाचे मनःपूर्वक कौतुक केले.
या उपक्रमात अमर सांगळे, अभय मळगावकर, मनोज खवणेकर, कैतान फर्नांडिस, सर्वेश बागकर, समीर राणे, ओमकार बागकर, ओंकार सोन्सुरकर, वैभव सोन्सुरकर, राकेश गुरव, दर्शन गावडे, तन्वी मोठे, अंकिता केरकर, संचिता पेडणेकर, प्राजक्ता भुबे, रेणुका चौगुले, नलिनी गावडे, निकिता वालावलकर, प्रियांका कुडव, रुचिता चोपडेकर आणि प्रियंका गवंडे यांचा सहभाग होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवयानी झोरे यांनी केले. आभार प्रदर्शन जुलेखाबी हैदर अली खान यांनी केले. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने प्राजक्ता भुबे, प्रियांका कुडव, निकिता वालावलकर आणि अभय मळगावकर यांनी मनोगत व्यक्त करून शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
माजी विद्यार्थ्यांनी दिलेले वस्तूरूपी योगदान हे केवळ मदत नसून शाळेशी असलेल्या जिव्हाळ्याचे, प्रेमाचे आणि कृतज्ञतेचे प्रतीक असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. माजी विद्यार्थी, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा स्नेहमेळावा आनंदात व अविस्मरणीय वातावरणात संपन्न झाला.













