देवरूख पोलीसांनी छडा लावला; चोरलेले दागिने बँकेत ठेवले गहाण; चर्चांना ऊत
देवरूख (प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील निवेबुद्रुक शिंदेवाडी येथील घरफोडीचा छडा लावण्यात देवरूख पोलीसांना यश आले असून विशेष म्हणजे या घरफोडी प्रकरणी पोलीसांनी घरमालकाच्या जावयालाच अटक केली आहे. त्याने चोरी केलेले सोन्याचे दागिने बँकेत गहाण ठेवल्याचे तपासात उघड झाले आहे. जावयानेच दागिन्यांवर डल्ला मारल्याने परिसरात चर्चांना उधाण आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, निवेबुद्रुक शिंदेवाडीतील रहिवासी संतोष दौलत पाल्ये यांच्या घरात २४ जानेवारी ते ५ मार्च २०२६ या कालावधीत चोरीची घटना घडली होती. यामध्ये घरातील बंद कपाटातील सोन्याचा हार, एक चैन अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. कपाटाचे कुलुप न फोडता अत्यंत शिताफीने ही चोरी करण्यात आली होती. या चोरीच्या घटनेची खबर संतोष पाल्ये यांनी देवरूख पोलीस ठाण्यात दिली होती. या तक्रारीनुसार पोलीसांनी अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. तपासादरम्यान पोलीसांना घरातील व्यक्तीवर संशय आला. यानंतर तांत्रिक विश्लेषण व सखोल चौकशीच्या आधारे संतोष पाल्ये यांचा जावई सचिन दत्तात्रय नाखरेकर याला पोलीसांनी ताब्यात घेतले. त्याने चौकशीअंती गुन्ह्याची कबूली दिली असून चोरलेले सोन्याचे दागिने बँकेत गहाण ठेवल्याचीही बाब समोर आली आहे, जावयानेच दागिने चोरल्याने परिसरात चर्चेला पेव फुटले आहे.













