आमदार दीपक केसरकर यांच्या पुढाकाराने मुंबईत आरोग्य भवनात महत्त्वाची बैठक
रिक्त पदे महिनाभरात भरण्याचे आरोग्य मंत्र्यांचे आदेश
सावंतवाडी | प्रतिनिधी : सावंतवाडी मतदारसंघातील प्रलंबित आरोग्य प्रश्नांबाबत आमदार दीपकभाई केसरकर यांच्या मागणीनुसार, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. श्री. प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मुंबईतील आरोग्य भवन येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सावंतवाडी येथील प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामातील कायदेशीर अडथळा दूर झाला असून, जिल्ह्यातील रिक्त वैद्यकीय पदे एका महिन्यात भरण्याचे ठोस निर्देश मंत्री महोदयांनी दिले आहेत.
सावंतवाडी येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर होऊन सात वर्षे झाली तरी जागेचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्याने बांधकाम रखडले होते. या बैठकीस उपस्थित असलेले राजघराण्याचे युवराज श्री. लखमराजे भोसले आणि श्री. कुमार भोगले यांनी लोकहितासाठी रुग्णालयाचे बांधकाम त्वरित सुरू होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. या कामासाठी आमची कोणतीही हरकत नसल्याचे सांगत त्यांनी न्यायालयात नाहरकत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे मान्य केले. या सकारात्मक प्रतिसादामुळे रुग्णालयाचा मार्ग मोकळा झाला असून, मंत्री आबिटकर यांनी या प्रकल्पाचे नवीन अंदाजपत्रक सादर करण्याचे आणि शेजारील उपजिल्हा रुग्णालयाची इमारत दोन मजली करण्याचा प्रस्ताव देण्याचे निर्देश दिले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने आरोग्य सेवेवर ताण येत आहे. यावर मंत्र्यांनी कडक भूमिका घेत महिनाभरात रिक्त पदे भरण्याचे आदेश दिले. तसेच, तांत्रिक कारणास्तव गोवा मेडिकल कॉलेज आणि बेळगाव येथील के.एल.ई. हॉस्पिटलमध्ये बंद पडलेली ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ पुन्हा सुरू करण्याबाबत सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन आमदार केसरकर यांना दिले.
सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला स्वच्छ आणि पर्यटन जिल्हा असल्याने, येथे येणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आरोग्य पर्यटनावर भर देण्यात आला. जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती श्री. प्रितेश राऊळ यांनी रेडी, आंबोली आणि आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘पंचकर्म सुविधा केंद्र’ आणि ‘आयुष वेलनेस क्लिनिक’ सुरू करण्याची मागणी केली. या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला देण्यात आले.
या बैठकीला आमदार दीपक केसरकर, युवराज लखमराजे भोसले, कुमार भोगले, आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, शहरी अभियान आयुक्त सुनील भोकरे, आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड, आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी सौ. सई धुरी व इतर अधिकारी उपस्थित होते.












