इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील अनधिकृत बदल व पोटभाडेकरूंच्या प्रश्नावरून संजू परब आक्रमक

न. प. प्रशासनाला सवाल ; संबंधित गाळे बेरोजगार तरुणांना देण्याची मागणी 

 

सावंतवाडी :

इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील अनधिकृत बदल, पोटभाडेकरूंचा प्रश्न, पाणी पुरवठा सभापतींची कथित क्लीनचीट आणि टेंडरशिवाय भरलेले खड्डे या विविध मुद्द्यांवरून सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांनी नगरपरिषद प्रशासनाला सवाल विचारला. आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेविका ॲड. नीता सावंत-कविटकर, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक आणि नगरसेवक देव्या सुर्याजी आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील २० गाळेधारकांनी भिंती काढल्याचा विषय सर्वसाधारण सभेत आणून काय साध्य केले, असा सवाल संजू परब यांनी केला. गेल्या २५ वर्षांपासून हा प्रकार सुरू असून प्रशासनाने ऑडिट करून दंड वसूल केला आहे. अशा वेळी नगरपरिषदेने स्वतः भिंती बांधून घेणे आवश्यक होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच मूळ भाडेकरू दीड हजार रुपये भाडे नगरपरिषदेला देऊन पोटभाडेकरूंकडून २०-२० हजार रुपये उकळत आहेत. प्रशासनाकडे याची यादी असूनही ते शांत का? असे गाळे तात्काळ ताब्यात घेऊन शहरातील बेरोजगार तरुणांना द्यावेत, असे आवाहन परब यांनी दिले.

पाणी पुरवठा सभापतींच्या

दरम्यान, पाणी पुरवठा सभापतींना सभागृहात दिलेली क्लीनचीट ही बेकायदेशीर असल्याचा दावा परब यांनी केला. मुख्याधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमल्याचे स्पष्ट केले असताना नगराध्यक्षा किंवा सभागृह निर्दोष असल्याचा निकाल कसा देऊ शकतात? चौकशी पूर्ण होईपर्यंत सभापतींचा राजीनामा मंजूर करावा आणि ते निर्दोष सुटल्यास त्यांना पुन्हा पदावर आणावे. विरोधी पक्षातील काही नगरसेवकही या क्लीनचीटला पाठिंबा देतात हे दुर्दैवी आहे. अभ्यास न करता बोलणाऱ्यांनी माझ्याशी आमनेसामने चर्चेला यावे, असा थेट इशारा त्यांनी दिला.

 

*टेंडर न काढता खड्डे भरले; मोती तलावाच्या कामावर नाराजी*

मुख्य रस्त्यावरील खड्डे टेंडर न काढताच भरण्यात आल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. नगराध्यक्ष आदेश देऊ शकतात, मात्र टेंडर प्रक्रियेनंतरच कामे झाली पाहिजेत, अधिकाऱ्यांनी वेडीवाकडी कामे करू नयेत, असा इशारा त्यांनी दिला. तसेच मोती तलावाच्या सुरू असलेल्या कामाच्या गुणवत्तेवर आपण असंतुष्ट असून, याप्रकरणी पालकमंत्री नितेश राणे व आमदार दीपक केसरकर यांचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

*मंत्री उदय सामंत यांचे आभार*

आडाळी एमआयडीसीसाठी इन्सुली ते आडाळीदरम्यान ३३ केव्ही वीज वाहिनी बांदा शहरातून जात असल्याने ग्रामस्थांनी विरोध केला होता. संजू परब यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली होती. मंत्री सामंत यांनी त्वरित ३ किलोमीटरची लाईन अंडरग्राऊंड (भूगत) करण्यास मंजुरी दिल्याबद्दल परब यांनी त्यांचे आभार मानले.