नाशिकमधील आयटी कंपनी प्रकरण: धर्मांतरण, शोषण आणि ‘ब्लॅक मॅजिक’ आरोपांमुळे खळबळ

फॉरेन्सिक तपासात मोबाईल डेटा उघड; अनेक गंभीर आरोप समोर
मुंबई पोलिसांचाही तपासात प्रवेश; काही आरोपी फरार असल्याची माहिती

नाशिकमधील एका आयटी कंपनीशी संबंधित प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. धर्मांतरण, महिलांचे लैंगिक शोषण आणि ‘ब्लॅक मॅजिक’सारख्या गंभीर आरोपांमुळे तपास यंत्रणा सक्रिय झाली आहे. फॉरेन्सिक लॅबच्या मदतीने एका आरोपीचा मोबाईल अनलॉक करून महत्त्वाचा डेटा मिळवण्यात आला आहे. या प्रकरणात काही जणांवर गंभीर आरोप असून मुंबई पोलिसांनीही तपासात प्रवेश केला आहे. काही आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती समोर आली आहे.


नाशिक : शहरातील एका आयटी कंपनीशी संबंधित प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली असून यात धर्मांतरण, महिलांचे शोषण आणि ब्लॅक मॅजिकसारखे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात दानिश एजाज शेख याचा मोबाईल न्यायालयाच्या विशेष परवानगीने फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासण्यात आला. फेस आयडीचा वापर करून मोबाईल अनलॉक करण्यात आला असून महत्त्वाचा डेटा मिळाल्याचे समजते.

तपासात मोबाईलमधील विविध ॲप्स आणि फायलींमध्ये स्वतंत्र पासवर्ड असल्याचे आढळले होते. मात्र फॉरेन्सिक तज्ज्ञांनी अखेर लॉक उघडण्यात यश मिळवले.

या प्रकरणात अनेक जणांचा सहभाग असल्याचा संशय असून तौसिफ बिलाल अत्तर, राजा रफीक मेमन, शाहरुख हुसैन, मोहम्मद शफी शेख, आसिफ आलम अन्सारी आणि अश्विनी अशोक चेनानी यांची नावे समोर आली आहेत. तर निदा एजाज खान अद्याप फरार असल्याचे सांगितले जात आहे.

तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात महिलांना आमिष दाखवून जाळ्यात ओढणे, मानसिक दबाव टाकणे आणि शोषण करण्याचे आरोप आहेत. तसेच काही धार्मिक विषयांवर वादग्रस्त टिप्पणी केल्याचाही उल्लेख तपासात आहे.

मोबाईल डेटाच्या तपासानंतर मुंबई पोलिसांचीही एन्ट्री झाली असून प्रकरणाचा तपास अधिक विस्तृत करण्यात आला आहे. काही आंतरराज्यीय कनेक्शन असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे नाशिकमध्ये मोठी चर्चा सुरू असून तपास यंत्रणा सर्व बाजूंनी चौकशी करत आहेत.