अशोक खरात प्रकरणामुळे वाढला दबाव
समता पतसंस्थेतील खात्यांवरून नवे प्रश्न उपस्थित
नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाची चौकशी दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे. या प्रकरणात अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींची नावे समोर येत असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. महिलांचे शोषण आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप अशोक खरातवर करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर समता पतसंस्थेचे संस्थापक काका कोयटे यांनी राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. या निर्णयामुळे सहकार क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
नाशिक : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत असून, आता या प्रकरणाची झळ सहकार क्षेत्रालाही बसली आहे. समता पतसंस्थेचे संस्थापक काका कोयटे यांनी राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
राज्य पतसंस्था फेडरेशनअंतर्गत सुमारे 15 हजार पतसंस्था कार्यरत आहेत. तसेच या फेडरेशनमध्ये सुमारे 6 हजार सभासद असल्याची माहिती आहे. काका कोयटे हे 2015 पूर्वीपासून या फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. मात्र, अशोक खरात आणि समता पतसंस्थेतील संबंधांची चर्चा रंगू लागल्यानंतर त्यांच्यावर दबाव वाढत असल्याचे बोलले जात होते.
दरम्यान, समता पतसंस्थेमध्ये अशोक खरात तब्बल 100 खात्यांचा नॉमिनी असल्याची माहिती समोर आली आहे. या खात्यांमधील व्यवहार आणि समभाग विक्री व्यवहारांवरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यामुळे सहकार क्षेत्रातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया देताना काका कोयटे यांनी आपण अशोक खरातचे भक्त नसल्याचे स्पष्ट केले. “माझा कोणत्याही भोंदू बाबाशी संबंध नाही. नाशिकमधील एका पतसंस्था फेडरेशनच्या कार्यक्रमात अशोक खरात उपस्थित होता, एवढाच संबंध आहे,” असे त्यांनी सांगितले.
तसेच समता पतसंस्थेमधील अनेक खाती कोविड काळात केवायसी प्रक्रियेद्वारे उघडण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काही खातेदार आता आमचा संबंध नसल्याचे सांगत असले, तरी त्याबाबत पुरावे सादर करणे कठीण असल्याचेही त्यांनी नमूद केले.
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास सुरू असून, या प्रकरणात आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिस आणि संबंधित यंत्रणा आर्थिक व्यवहार तसेच इतर आरोपांची सखोल चौकशी करत आहेत.











