Ismail Ahmad Found Dead In PoK : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वर्धापनदिनी पाकमध्ये मोठा थरार; हाफिज सईदचा उजवा हात आणि ‘लष्कर’चा टॉप कमांडर इस्माईल अहमदचा संशयास्पद मृत्यू!

कोण होता हा इस्माईल अहमद?

इस्माईल अहमद हा केवळ एक सामान्य दहशतवादी नव्हता, तर तो ‘लष्कर-ए-तैयबा’च्या मुख्य कोअर कमिटीचा (सुकाणू समिती) एक अत्यंत महत्त्वाचा सदस्य होता. भारताला, आणि विशेषतः जम्मू-काश्मीरला टार्गेट करण्यासाठी आखण्यात आलेल्या अनेक भयंकर दहशतवादी कटांमध्ये तो थेट सामील होता. गेल्या काही काळापासून भारताने जागतिक स्तरावर हाफिज सईद आणि त्याच्याशी संबंधित दहशतवादी जाळ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रचंड दबाव आणला आहे. अशा कडक पाळतीखाली आणि तणावपूर्ण वातावरणात इस्माईलचा हा मृत्यू दहशतवादी गोटातील मोठी पडझड मानली जात आहे. इस्माईल अहमदचा मृत्यू ही काही पहिली घटना नाही. गेल्याच महिन्यात पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात ‘लष्कर’चा आणखी एक वरिष्ठ कमांडर शेख युसूफ आफ्रिदी याची अज्ञात बंदूकधाऱ्यांनी भरदिवसा हत्या केली होती. ही पूर्वनियोजित ‘टार्गेट किलिंग’ (Targeted Killing) असल्याचा संशय स्थानिक प्रशासनाला आहे.

डोंगराळ भागात मारेकऱ्यांचे पलायन

या हत्येचा थरार एखाद्या चित्रपटासारखा होता. पूर्ण तयारीनिशी आलेल्या सशस्त्र मारेकऱ्यांनी आफ्रिदीवर अचानक हल्ला चढवला. त्यांनी अत्यंत जवळून आणि बेछूट गोळीबार केल्यामुळे आफ्रिदीला तिथून पळ काढण्याची कसलीच संधी मिळाली नाही. शरीरात अनेक गोळ्या घुसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात तिथेच कोसळला आणि जागीच ठार झाला. ही कारवाई फत्ते केल्यानंतर सर्व मारेकरी डोळ्यांदेखत तिथल्याच जवळच्या डोंगराळ आणि दुर्गम भागात पसार झाले.

सुरक्षित गडावर घुसून मारला होता बिलाल आरिफ सलाफी

या हत्यासत्राची सुरुवात याच वर्षी मार्च महिन्यात झाली होती. त्यावेळी पाकिस्तानच्या मुरीदके येथील ‘मरकज तैयबा’ या दहशतवाद्यांच्या सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मुख्यालयात घुसून लष्कर-ए-तैयबाचा आणखी एक मोठा कमांडर बिलाल आरिफ सलाफी याचा खात्मा करण्यात आला होता. विशेष म्हणजे, ईदची नमाज अदा करून तो बाहेर पडताच काही क्षणांतच अज्ञात मारेकऱ्यांनी त्याच्यावर गोळीबार केला आणि नंतर चाकूने भोसकून त्याची निर्घृण हत्या केली होती.