‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या जयघोषाने वैभववाडी नगरी दुमदुमली
सिंधुदुर्ग वारकरी सांप्रदायचे कार्याध्यक्ष संतोष राऊळ यांच्या हस्ते दिंडीचा शुभारंभ
वैभववाडी l प्रतिनिधी : ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’, ‘जय जय राम कृष्ण हरी’ अशा विठ्ठलनामाच्या अखंड जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात वैभववाडी येथून कोकण दिंडी कार्तिकी पायी वारी श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली. वैभववाडी ते श्री क्षेत्र पंढरपूर अशी ही पायी वारी असून, वैभववाडी तालुका श्री हरी वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने दरवर्षी या दिंडीचे आयोजन केले जाते.
वैभववाडी येथील दत्त मंदिर परिसरात या दिंडीचा शुभारंभ करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी सांप्रदाय मंडळाचे कार्याध्यक्ष संतोष राऊळ यांच्या हस्ते नारळ वाढवून दिंडीला भक्तिमय वातावरणात प्रारंभ करण्यात आला. मंगळवारी सकाळी दहा वाजता झालेल्या या सोहळ्यास तालुक्यातील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेली अनेक वर्षे वैभववाडी ते पंढरपूर अशी ही पायी वारी अखंडितपणे सुरू आहे. विठ्ठलभक्तीचा वारसा जपत तालुक्यातील वारकरी दरवर्षी मोठ्या उत्साहाने या वारीत सहभागी होतात. पांडुरंगाच्या दर्शनाची आस आणि हरिनामाचा गजर करत वारकऱ्यांनी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. यावेळी संपूर्ण दत्त मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.
दिंडीच्या शुभारंभप्रसंगी संतोष राऊळ, भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे आणि माजी उपनगराध्यक्ष संजय सावंत यांनी मनोगत व्यक्त करून वारकऱ्यांना पायी वारीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष प्राची तावडे, सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय मंडळाचे सेक्रेटरी गणपत घाडीगावकर, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस बाळ खडपकर, वारकरी मंडळाचे अध्यक्ष सुरेश पांचाळ, संचालक विजय चव्हाण, सल्लागार प्रकाश अडुळकर, दिगंबर गुरव, बाबू काटाळे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते.













