व्याजाच्या पैशांसाठी महिलेला धमकावत केला अत्याचार
मोबाईलमध्ये शेकडो आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याचा दावा
कोल्हापूर जिल्ह्यात एका सावकाराविरोधात महिलेवर अत्याचार करून तिचा व्हिडिओ तयार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. व्याजाने पैसे दिल्यानंतर आर्थिक अडचणीत सापडलेल्या महिलेचा गैरफायदा घेत आरोपीने हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर गांधी नगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीच्या मोबाईलमध्ये अनेक महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याचा धक्कादायक दावा पीडितेने केला आहे. या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यातील गांधीनगर परिसरात एका सावकाराने महिलेवर अत्याचार करून तिचा व्हिडिओ शूट केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अमित सावंत याला गांधी नगर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमित सावंत हा सावकारीचा व्यवसाय करत होता. कोल्हापूरजवळील गडमुडशिंगी गावातील एका महिलेला आर्थिक गरज असल्याने तिने सावंत याच्याकडून सुमारे दोन लाख रुपये व्याजाने घेतले होते. सुरुवातीला महिला नियमित व्याज भरत होती. मात्र, काही महिन्यांनंतर तिची आर्थिक परिस्थिती बिघडल्याने व्याज देणे शक्य झाले नाही.
याच परिस्थितीचा फायदा घेत आरोपीने महिलेला धमकावत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. एवढ्यावरच न थांबता त्याने संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ शूट केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर आरोपीने हा व्हिडिओ दाखवून महिलेला वारंवार धमकावत अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.
पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा नीचपणा इतक्यावर थांबला नाही. त्याने संबंधित व्हिडिओ आपल्या काही मित्रांनाही दाखविल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या महिलेने आरोपीला जाब विचारला. मात्र, त्यानंतरही आरोपीने तिला धमकावल्याचे सांगण्यात आले.
अखेर पीडित महिलेने गांधी नगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अमित सावंत याला अटक केली. दरम्यान, या प्रकरणात रोहित कदम याचाही उल्लेख करण्यात आला असून पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे.
पीडितेने आणखी धक्कादायक दावा करत आरोपीच्या मोबाईलमध्ये २०० ते ३०० आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून मोबाईलची तपासणी सुरू असून इतर महिलांनीही पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.









