मसुरे | झुंजार पेडणेकर : माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय वडाचापाट येथे महिला व किशोरवयीन मुलींचे आरोग्य, योग्य आहार, पोषण आणि वैयक्तिक स्वच्छतेविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने ग्रामपंचायत वडाचापाट यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय येथे आरोग्य व आहारविषयक मार्गदर्शन तसेच सॅनिटरी पॅड वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गावच्या सरपंच सौ. सोनिया दयानंद प्रभुदेसाई , उपसरपंच सचिन पाताडे, पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई, आहारतज्ज्ञ डॉ. गार्गी ओरोसकर, ग्रामपंचायत अधिकारी लक्ष्मण सरमळकर, ग्रामपंचायत सदस्य विनायक प्रभुदेसाई, वेदिका माळकर, सोनल मांजरेकर, सविता पालव, सीएचओ भक्ती परब , पेडणेकर मॅडम, चाफेखोलच्या सरपंच सौ. रविना घाडीगावकर, अंगणवाडी सेविका, पाटकर मॅडम, प्राथमिक शिक्षिका पालव मॅडम तसेच बचत गटाच्या पालव मॅडम यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी आहारतज्ज्ञ डॉ. गार्गी ओरोसकर यांनी किशोरवयीन मुली व महिलांना योग्य आहार, पोषणमूल्ये, आरोग्याची काळजी आणि वैयक्तिक स्वच्छता याविषयी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले.
तसेच गावच्या सरपंच सौ. सोनिया प्रभुदेसाई यांनी महिलांच्या आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करत अशा आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. भक्ती परब मॅडम यांनीही मासिक पाळीतील स्वच्छता, आरोग्यविषयक काळजी आणि योग्य सवयी याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला हायस्कूलमधील विद्यार्थिनी, गावातील किशोरवयीन मुली तसेच महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिला व किशोरवयीन मुलींना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.
महिला आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणारा, किशोरवयीन मुलींना योग्य मार्गदर्शन देणारा आणि महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देणारा ग्रामपंचायत वडाचापाटचा हा उपक्रम कौतुकास्पद व प्रेरणादायी ठरला.













