सावंतवाडीतील क्रीडा सुविधांचा विस्तार करणार
शहर विकासासाठी सत्ताधारी-विरोधकांत समन्वय साधणार
सावंतवाडी | प्रतिनिधी : सावंतवाडी शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार असून, शहरासाठी ५ कोटी रुपये खर्चाचे क्रीडा संकुल मंजूर झाले आहे. यामध्ये इनडोअर आणि आऊटडोअर अशा दोन्ही प्रकारच्या खेळांच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती माजी मंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी न.प.चे आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडीवरेकर, पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, उद्यान सभापती सौ. मोहिनी मडगावकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
क्रीडा संकुलासाठी अतिरिक्त ७ कोटी रुपये देखील मंजूर झाले असून, तिथे सेमी ऑलिम्पिक स्विमिंग पूलसह विविध खेळांच्या सुविधा असतील. प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या नावाने येथे ड्रेसिंग रूम उभारण्यात आली आहे. क्रिकेटसह सर्व मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्याचा आमचा मानस आहे. नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले आणि क्रीडा सभापती सुधीर आडीवरेकर या कामात जातीने लक्ष घालत असून पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. केवळ सावंतवाडीच नव्हे, तर बांदा आणि दोडामार्ग येथेही क्रीडा संकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
सावंतवाडी पालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील मतभेदांवर भाष्य करताना केसरकर म्हणाले, “येत्या आठवड्यात मी स्वतः न.प.ला भेट देऊन कामांचा आढावा घेणार आहे. दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांना एकत्र बसवून त्यांच्यातील मतभेद दूर करून समन्वय साधण्याचा माझा प्रयत्न असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडी आणि कुडाळला आता राधानगरी आणि खारेपाटण अशा दोन्ही ठिकाणांहून वीज पुरवठा होणार आहे. पर्यायी व्यवस्था उपलब्ध झाल्यामुळे पुढील पाच महिन्यांत वीज कपातीचा त्रास कायमचा दूर होईल.
शहराला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून, लवकरच ही नियुक्ती होईल. तसेच नळ योजना आणि गॅस पाईपलाईनच्या कामामुळे सध्या नागरिकांची गैरसोय होत असली, तरी भविष्यातील सोयीसाठी ही कामे होणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
दगड खाणींवर होणारे मारहाणीचे प्रकार चुकीचे असून, त्याची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात येतील. तसेच विनापरवाना वाळू उत्खनन होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. दगड खाणींमुळे स्थानिक नागरिकांना त्रास होऊ नये, याचीही काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
दरम्यान, कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या पक्षांतराच्या चर्चेवर बोलताना केसरकर म्हणाले की, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, मात्र त्यांनी शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला तर आम्ही त्यांचे स्वागतच करू. तसेच आमदार प्रमोद जठार यांच्या विधानावर भाष्य करताना, जिल्ह्यात महायुती भक्कम असून ती कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.












