कृणाल पांड्या आणि निकोलस पूरनमध्ये वाद? व्हायरल व्हिडिओनंतर दोघांनीही दिले स्पष्टीकरण

मैदानावरील चर्चेनंतर सोशल मीडियावर रंगल्या चर्चांना पूर्णविराम
‘कोणताही लफडा नाही, फक्त प्रेम’ म्हणत कृणालचा खुलासा

आयपीएल २०२६ मधील लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू सामन्यानंतर कृणाल पांड्या आणि निकोलस पूरन यांच्यात वाद झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. सामन्यानंतरचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांमध्ये विविध तर्कवितर्क सुरू झाले होते. मात्र कृणाल पांड्याने सोशल मीडियावर पोस्ट करत या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. पूरननेही प्रतिक्रिया देत दोघांमध्ये कोणताही वाद नसल्याचे स्पष्ट केले. मैदानावरील ती चर्चा ही फक्त मैत्रीपूर्ण संवादाचा भाग असल्याचे दोघांनी सांगितले.


लखनौ : लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात झालेल्या आयपीएल २०२६ सामन्यानंतर कृणाल पांड्या आणि निकोलस पूरन यांच्यात वाद झाल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर जोर आला होता. एका व्हायरल व्हिडिओमुळे दोघांमध्ये तणाव निर्माण झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

सामन्यादरम्यान कृणाल पांड्याने पूरनला सलग दोन वेगवान बाऊन्सर टाकले होते. त्यानंतर सिंगल घेताना दोघांमध्ये काही शब्दांची देवाणघेवाण झाल्याचे दिसले. सुरुवातीला हा प्रकार मैदानावरील सामान्य स्पर्धात्मक वातावरणाचा भाग मानला जात होता.

मात्र सामन्यानंतरचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये निकोलस पूरन हा कृणालशी बोलताना दिसत होता. त्यावेळी त्याने कृणालचा कॉलर पकडल्यासारखे आणि हलकेच दूर ढकलल्यासारखे दृश्य दिसल्याने चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण आले.

या चर्चांनंतर कृणाल पांड्या याने सोशल मीडियावर पूरनसोबतचा फोटो शेअर करत सर्व अफवांवर पडदा टाकला. “कोणताही लफडा नाही, फक्त प्रेम,” असे म्हणत त्याने पूरनचे १०० आयपीएल सामने पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच “बाऊन्सर कसा होता?” असा हलकाफुलका सवालही केला.

कृणालच्या पोस्टवर निकोलस पूरन यानेही प्रतिक्रिया देत, “इथे फक्त प्रेम आहे. तो माझ्या सर्वोत्तम मित्रांपैकी एक आहे,” असे म्हटले. त्यामुळे दोघांमधील कथित वादाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला.

कृणाल आणि पूरन हे आयपीएल २०२३ आणि २०२४ मध्ये लखनौ सुपर जायंट्स संघाकडून एकत्र खेळले होते. त्यामुळे दोघांमध्ये चांगली मैत्री असून मैदानावरील संवाद हा केवळ मैत्रीपूर्ण स्वरूपाचा असल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, या सामन्यात मिचेल मार्श याच्या शानदार शतकाच्या जोरावर लखनौने डीएलएस पद्धतीने आरसीबीवर नऊ धावांनी विजय मिळवला. तसेच प्रिन्स यादव याने विराट कोहलीला शून्यावर बाद करत संघाला महत्त्वाची सुरुवात करून दिली.