रत्नागिरीत आपल्याला मोठी लढाई लढायची आहे!-आ. प्रमोद जठार

कुंपणावर असलेलेही लवकरच भाजपमध्ये
आ. जठार यांचे चिपळूणमध्ये जल्लोषात स्वागत

चिपळूण (संतोष सावर्डेकर):— भाजपाने आपली जी निवड केली आहे. ती समन्वयासाठी केलेली आहे. समन्वयातून संयोजक म्हणून जबाबदारी पार पाडणार आहे. भाजप कार्यकर्त्यांनी आप-आपसात भांडायचे नाही. रत्नागिरीत आपल्याला मोठी लढाई लढायची आहे. आगामी सन २०२९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री असावा, असं वाटतं ना! इथला भाजपचा आमदार असावा असं वाटतं की नाही! मग कामाला लागा! असे आवाहन नवनिर्वाचित विधानपरिषदेचे भाजपा आ. प्रमोद जठार यांनी करतांना कुंपणावर असलेले ही लवकरच भाजपमध्ये येतील असा देखील दावा यावेळी केला.

महाराष्ट्र विधानपरिषद आमदार म्हणून निवड झाल्यानंतर प्रमोद जठार यांनी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शनिवारी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा केला. त्यानिमित्त आ. जठार यांनी शनिवारी रात्री चिपळूण शहर आणि चिपळूण ग्रामीण मंडलातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेऊन आभार मानले. तसेच सर्वांशी संवाद साधला. मार्कंडी येथील भाजप संपर्क कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, संघटन मंत्री शैलेंद्र दळवी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, भाजपच्या श्रेष्ठींनी आपल्यावर जो विश्वास दाखवला आहे. तो विश्वास सार्थकी ठरवताना आपण श्रेष्ठींचे ऋणी आहोत, असे भाषणाच्या सुरुवातीला आ. प्रमोद जठार यांनी पक्षाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. भाजप पक्षाने विधान परिषदेचे आमदारकी ही पालघर जिल्ह्यापासून ते सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत तंटामुक्ती अध्यक्षासारखे काम करण्यासाठी दिलेली आहे. पद आणि लोकप्रतिनिधी होण्यात फरक आहे. दोन्ही पदे मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. पक्षाशी समर्पित व्हावं लागतं. सोबत नशिबाची साथ देखील असावी लागते, असे आ. जठार यांनी यावेळी नमूद केले.

पश्चिम बंगालमध्ये भाजपने निर्भेळ यश मिळवले

पश्चिम बंगालमध्ये आपण निवडणुका जिंकू असे कधी वाटले होते का मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने निर्भळ यश मिळवले आहे. भाजपाची केंद्रासह अनेक राज्यात सत्ता आहे. मात्र, पश्चिम बंगालमध्ये भाजपाची सत्ता का असावी? असे भाजपला वाटत होते. तर तृणमूलच्या ममता बॅनर्जी यांनी बांगलादेशवासींयांसाठी आपल्या देशाची सीमा खुली ठेवली होती. यामुळे देशात बांग्लादेशींची घुसखोरी वाढत होती. आता घुसखोरी थांबणार आहे. तर पश्चिम बंगालमध्ये भाजपाची सत्ता येण्यासाठी सतीश धोंड सारख्या अनेक कार्यकर्त्यांनी अपार मेहनत घेतली आहे. आपण देखील पश्चिम बंगालमध्ये पक्षवाढीसाठी मेहनत घेतलेली आहे, असे सांगताना काही अनुभव कथन केले.

भाजपात नवीन लोकांचा सन्मान झाला पाहिजे

रत्नागिरी जिल्ह्यात भाजपा शत प्रतिशत: होण्यासाठी नवीन लोकांना भाजप पक्षात सामील करून घ्या. नवीन लोकांचा सन्मान झाला पाहिजे. हेतूपासून ढळू नका. पदात अडकू नका, पक्षासाठी वेळ द्या, सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा. भाजपा राष्ट्रीय पार्टी आहे. राष्ट्र रक्षणाची पार्टी आहे. तेव्हा राष्ट्र प्रवाहात सामील व्हा, असे आवाहन आमदार प्रमोद जठार यांनी यावेळी केले.

चिपळूणमध्ये मार्कंडी कार्यालयाजवळ आमदार जठार यांचे आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत आणि ढोलपथकाच्या गजरात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुधीरकाका भागवत यांची आमदार जठार यांनी भेट घेतली. यावेळी चिपळूण शहर आणि चिपळूण ग्रामीण मंडलाच्या वतीने मंडल अध्यक्ष विनोद भुरण आणि शशिकांत मोदी यांनी दोन्ही मंडलांच्या वतीने आमदार जठार यांचा सत्कार केला.

यावेळी चिपळूणच्या उपनगराध्यक्ष रुपाली दांडेकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, जिल्हा सरचिटणीस सुप्रिया उतेकर, जिल्हा चिटणीस ॲड्. नयना पवार, नगरसेविका रसिका देवळेकर, नगरसेविका अंजली कदम, नगरसेविका शितल रानडे, नगरसेवक शुभम पिसे, नगरसेवक संदीप भिसे, पंचायत समिती सदस्य सौ. सायली वाजे, चिपळूण ग्रामीण महिला मोर्चा अध्यक्ष आदिती गुडेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल पवार, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष लियाकत शाह, यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी, चिपळूण शहर आणि चिपळूण ग्रामीण मंडलातील भाजपचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.