दोडामार्ग :सुहास देसाई
तालुक्यातील आडाळी येथे भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना समोर आली आहे. घर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने कपाटातील सुमारे ८० हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार चोरून नेला. याप्रकरणी दोडामार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी भरत लक्ष्मण सावंत (वय ५०, रा. आडाळी) हे १० मे रोजी दुपारी १.३० ते ३.४५ च्या सुमारास गावात आयोजित मूर्ती स्थापना कार्यक्रमासाठी माऊली मंदिरात गेले होते. घर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने घराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. कपाटातील सामानाची उचकापाचक करून चोरट्याने ८० हजार रुपये किमतीचा जुना वापरता सोन्याचा हार लंपास केला.सावंत घरी परतल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी त्यांनी तात्काळ दोडामार्ग पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ७५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(A) व ३३१(३) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक केरकर करत आहेत.
पोलीस प्रशासनाचे आवाहन
तालुक्यात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. “नागरिकांनी घरामध्ये मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने किंवा रोख रक्कम ठेवून घर बंद करून बाहेरगावी जाऊ नये. सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ दोडामार्ग पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा,” असे आवाहन त्यांनी केले आहे.











