जळगावात भोंदू बाबा आणि महिला पोलिसकडून दाम्पत्याची लाखोंची फसवणूक; अघोरी पूजेच्या नावाखाली उकळले पैसे

अजमेरच्या पीराचा अंग असल्याचा दावा करत जोडप्याला जाळ्यात ओढले
अघोरी पूजा, होमहवन आणि धमक्यांमुळे दाम्पत्य भयभीत

जळगावमध्ये एका भोंदू बाबा आणि त्याच्या महिला पोलिस पत्नीने दाम्पत्याची तब्बल ११ लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घरातील वाद मिटवून शांतता निर्माण करून देण्याचे आमिष दाखवत या जोडप्याला जाळ्यात ओढण्यात आले. अजमेरच्या पीराचा अंग असल्याचा दावा करत विविध अघोरी पूजा आणि विधी करण्यात आले. देशातील विविध धार्मिक स्थळी नेऊन बनावट पूजा करून मोठी रक्कम उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत.


जळगाव : सध्या राज्यात विविध ठिकाणी भोंदू बाबांचे प्रकार उघडकीस येत असताना जळगावमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कमचंद जैन नगरातील एका दाम्पत्याची ११ लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप एका भोंदू बाबा आणि त्याच्या महिला पोलिस पत्नीवर करण्यात आला आहे. सिद्धी प्राप्त आहे, अजमेरच्या पीराचा अंग आहे, तसेच घरातील भांडणे आणि वाद दूर करून शांतता निर्माण करून देतो, असे सांगून या दाम्पत्याला जाळ्यात ओढण्यात आले.

या प्रकरणी भोंदू बाबा ललित पाटील आणि त्याची पत्नी महिमा उर्फ मनोरमा यांच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हे दोन्ही आरोपी गेल्या काही काळापासून फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. मुंबईसह विविध भागांमध्ये शोधमोहीम राबवण्यात आली असून मोबाईल लोकेशन आणि सीडीआरच्या माध्यमातून तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

तक्रारदार महिलेला तिच्या कुटुंबात सतत वाद आणि भांडणे होत असल्याने मानसिक त्रास होत होता. याचाच फायदा घेत तिची ओळखीची असलेली महिमा उर्फ मनोरमा हिने तिचा विश्वास संपादन केला. “आमच्याकडे अजमेरच्या पीराची शक्ती आहे. आम्ही लोकांची संकटे दूर करतो,” असे सांगत तिने दाम्पत्याला आपल्या जाळ्यात अडकवले. तसेच मुंबई, दिल्ली, राजस्थान आणि अजमेर येथून अनेक लोक आमच्याकडे येतात, असे सांगून विश्वास अधिक वाढवला.

यानंतर या दाम्पत्याची भेट भोंदू बाबाशी घालून देण्यात आली. त्यावेळी घरातील वादाचे कारण मृत दिराचा आत्मा असल्याचे सांगण्यात आले. तुझ्या दिराचा आत्मा तुला त्रास देत आहे, असे सांगून विविध अघोरी पूजा, विधी, होमहवन आणि धार्मिक कार्यक्रम सुरू करण्यात आले. वेळोवेळी पैसे उकळत या दाम्पत्याकडून एकूण ११ लाख ३२ हजार रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यासाठी दाम्पत्याला तनोट माता मंदिर, उज्जैन, गोगामेडी, पुष्कर, अजमेर आणि ओंकारेश्वर या ठिकाणी नेण्यात आले. तिथे विविध बनावट अघोरी पूजा करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. उज्जैनमध्ये स्मशानभूमीतही अघोरी विधी करण्यात आल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे तर आरोपींकडून “माझ्या नादी लागू नका, तुमचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल,” अशा प्रकारच्या धमक्याही देण्यात आल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून भोंदू बाबांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.