हार्दिकच्या पाठीच्या दुखापतीवर वैद्यकीय पथकाचे लक्ष
मुंबई इंडियन्सचा प्लेऑफमधून अधिकृतपणे पत्ता कट
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या सलग दुसऱ्या सामन्यात अनुपस्थित राहिल्याने चाहत्यांमध्ये चिंता वाढली आहे. त्याच्या पाठीच्या दुखापतीमुळे तो सध्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली उपचार घेत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून झालेल्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचे प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आले. संघाचा हंगाम अत्यंत निराशाजनक ठरल्याचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी मान्य केले. हार्दिकच्या पुनरागमनाबाबत अंतिम निर्णय त्याच्या फिटनेसवर अवलंबून असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नवी दिल्ली : हार्दिक पांड्या नेमका कधी मैदानात परतणार, त्याची दुखापत किती गंभीर आहे आणि तो पुढील सामन्यांसाठी उपलब्ध होणार का, असे अनेक प्रश्न सध्या मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांकडून विचारले जात आहेत. IPL 2026 मध्ये सलग दुसऱ्या सामन्यात हार्दिक अनुपस्थित राहिल्याने संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव याच्याकडे सोपवण्यात आले होते.
रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा दोन गडी राखून पराभव केला. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी हार्दिकच्या दुखापतीबाबत महत्त्वाची माहिती दिली.
जयवर्धने म्हणाले की, हार्दिक पांड्याच्या पाठीमध्ये त्रास जाणवत असून त्यावर उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून तो सराव करू शकत नव्हता. त्यामुळे त्याच्या फिटनेसबाबत पूर्ण खात्री नसताना कोणतीही जोखीम घ्यायची नव्हती. वैद्यकीय पथक त्याच्यावर सतत लक्ष ठेवून आहे आणि त्याच्या प्रकृतीनुसार पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा IPL 2026 मधील प्रवास जवळपास संपुष्टात आला आहे. पाच वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या या संघाने आतापर्यंत 11 सामने खेळले असून त्यापैकी केवळ 3 सामने जिंकले आहेत, तर 8 सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला आहे. लखनौ सुपर जायंट्सनंतर स्पर्धेबाहेर जाणारा मुंबई इंडियन्स हा दुसरा संघ ठरला आहे.
सामन्यानंतर बोलताना महेला जयवर्धने यांनी संघाच्या कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, हा संपूर्ण हंगाम संघासाठी निराशाजनक ठरला. अनेक सामने जिंकण्याच्या स्थितीत असूनही संघ सातत्य राखू शकला नाही. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांमध्ये सातत्याचा अभाव स्पष्टपणे दिसून आला आणि त्याचाच फटका संघाला बसला. काही महत्त्वाचे सामने जिंकण्यात संघ अपयशी ठरल्यामुळे प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागल्याचे त्यांनी मान्य केले.










