▪️दिल्लीत देवगड हापूसचा डंका
▪️देवगडच्या आंबा बागायतदारांची नवी झेप
▪️हापूस उत्सवावर दिल्लीकर फिदा

झुंजार पेडणेकर | मसुरे :कोकणातील देवगड आणि राजापूर या भागातून थेट आलेल्या नैसर्गिकरित्या पिकलेल्या हापूस आंब्याला खरेदी करण्यासाठी दिल्लीतील नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. ग्राहकांचा उत्साह इतका मोठा होता की दुपारपर्यंत सर्व पेट्यांची विक्री झाली. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतच्या अनेक राज्यांतील अनेक प्रकारचे आंबे उपलब्ध असलेल्या दिल्लीच्या बाजारपेठेत अस्सल देवगड आणि रत्नागिरीच्या मातीत उगवलेला फळांचा राजा हापूस आंबा दाखल झाला आणि अवघ्या तीन तासांत या आंब्याच्या एक डझनच्या तब्बल एक हजार पेट्या हातोहात विकल्या गेल्या. कोकण हापूससाठी खास आलेल्या अनेक दिल्लीकरांना नाराज होऊन परतावे लागले. निमित्त होते नवीन महाराष्ट्र सदनात भरलेल्या कोकण हापूस आंबा महोत्सवाचे! या आंबा महोत्सवात देवगड तालुका आंबा उत्पादक संस्था जामसंडेचे संतोष पाटकर (जामसंडे ), विद्याधर माळगावकर (गिर्ये ), हर्षल पाटील (दहिबाव ) हे आंबा बागायतदार सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सहभागी झाले होते.चला तर मग वाचूया दिल्ली गाजवलेल्या देवगड हापूसची गोड कहाणी…….!
▪️ विमानाने हापूस दिल्लीत रवाना
दिल्लीमधील हापूस आंबा विक्रीचा अनुभव अविस्मरणीय असल्याचे पाटकर सांगतात. तसेच यासाठी शासनाच्या कृषी विभागाचे विशेष आभार सुद्धा त्यांनी मानले आहेत.सिंधुदुर्ग मधून पाचशे डझन आंबा विशेष पॅकिंग सह देवगड मधून प्रथम मोपा विमानतळ गोवा व नंतर विमानाने थेट दिल्ली मध्ये नेण्यात आला. वाहतुकीचा खर्च शासनाचा होता. दिल्ली विमानतळावरून आंबा महाराष्ट्र सदन येथे नेण्यात आला. व महाराष्ट्र दिनी हापूस आंबा महोत्सवात ग्राहकांसाठी उपलब्ध झाला. सदर आंबा हा गुणवत्ता पूर्ण दर्जेदार आणि निर्यातीचे सर्व निकष पूर्ण करणारा होता असे पाटकर यानी सांगितले.
▪️जीआय टॅगिंग मुळे ग्राहक खुश
सर्व आंबे जीआय टॅगिंग केलेले होते. त्यामुळे ग्राहकांना क्युआर कोड स्कॅन केल्यानंतर आंबा देवगडचाच आहे याची खात्री होत होती. आंब्यात साका नसल्याबाबत पूर्णपणे स्कॅन केलेला होता.त्याचे पॅकिंग सुद्धा एक्स्पोर्ट पद्धतीचे करण्यात आले होते. येथे विक्री केलेल्या आंब्याला चौदाशे ते एकोणीसशे रुपये प्रति डझन दर मिळाल्याचे पाटकर सांगतात. कदाचित आणखी सुद्धा दर मिळाला असता परंतु शासनाचे कमी किमतीत हा आंबा दिल्लीकरांना चाखता यावा, हापूसचा प्रसार व्हावा हा उद्देश असल्याने माफक दर ठेवण्यात आला होता. या महोत्सवासाठी कोकण विभाग कृषी सहसंचालक शिवाजी आमले, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री नाईकनवरे, उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील, देवगड कृषी अधिकारी आणि कृषी विभागाचे चांगले सहकार्य या सर्व प्रक्रियेत लाभल्याचे पाटकर सांगतात.
▪️साडेतीन तासात हजार डझन आंबा विक्री
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘कोकण हापूस आंबा महोत्सवाला’ दिल्लीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कोकणच्या हापूसची मोहिनी इतकी जबरदस्त ठरली की, सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या महोत्सवातील तब्बल १,००० डझन आंब्याचा साठा अवघ्या साडेतीन तासांत म्हणजेच दुपारी १:३० वाजेपर्यंत पूर्णपणे संपला.
▪️कृषी विभाग आणि महाराष्ट्र सदनचे आयोजन
या महोत्सवाचे आयोजन कृषी विभाग आणि महाराष्ट्र सदन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र सदनाच्या आयुक्त श्रीमती आर. विमला (IAS) यांच्या हस्ते करण्यात आले.
विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग (ठाणे) श्री. शिवाजी आमले यांची प्रमुख उपस्थिती होती. कोकणातील देवगड आणि राजापूर या भागांतून थेट आलेल्या नैसर्गिकरित्या पिकलेल्या हापूस आंब्याला खरेदी करण्यासाठी दिल्लीतील नागरिकांनी गर्दी केली.
“कोकणातील शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि दिल्लीतील नागरिकांना अस्सल हापूसची चव चाखायला मिळणे, हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश होता”.
▪️दिल्ली वारीने बागायतदार समाधानी
या महोत्सवामुळे कोकणच्या हापूसची कीर्ती राष्ट्रीय राजधानीत पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी यशस्वी बाजारपेठ ठरली आहे. पुढील वर्षी केवळ एक दिवस नाही तर 15 एप्रिल पासूनच आंबा विक्री करण्याचा निर्णय बागायतदारांनी घेतल्याचे पाटकर यानी सांगितले. “कोकणचा राजा आता देशाची राजधानी गाजवत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमधील प्रयोगशील शेतकऱ्यांनी ५०० डझन हापूस आंबा थेट विमानाने दिल्लीत पोहोचवला. महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित या उपक्रमात दिल्लीकरांनी अक्षरशः रांगा लावून हा आंबा खरेदी केला. स्थानिक बाजारपेठेपेक्षा अधिक दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान असून, हा प्रयोग कोकणच्या आंबा बागायतदारांसाठी एक नवी दिशा ठरत आहे….!
▪️ दिल्लीकरांचा तडाखेबंद प्रतिसाद!
कृषी सहसंचालक (कोकण विभाग) शिवाजी आमले- दिल्लीकरांनी दिलेला हा तडाखेबंद प्रतिसाद पाहून पुढील वर्षी आंब्याच्या हंगामामध्ये दर १५ दिवसांनी अशाच एक कोकण आंबा महोत्सवाद्वारे राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने दिल्लीकरांसाठी कोकण-देवगड आंबे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे कृषी सहसंचालक (कोकण विभाग) शिवाजी आमले यांनी सांगितले. कोकणातील शेतकऱ्यांना दिल्लीसारखी मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे केवळ आंबा विक्रीच झाली नाही, तर कोकणच्या पर्यटनाला आणि कृषी संस्कृतीलाही राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली आहे.
कोकणच्या हापूसची चव सातासमुद्रापार गेली आहेच, पण दिल्लीतील मराठी बांधवांसह स्थानिक नागरिकांनी दिलेला हा प्रतिसाद आमच्यासाठी उत्साहवर्धक आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीला योग्य फळ मिळत आहे असेही त्यांनी सांगितले.













