चोच नसतानाही ‘ब्रूस’ ठरला केआ पोपटांचा राजा; न्यूझीलंडमधील अनोखी कहाणी चर्चेत

अपूर्ण चोचीसह जन्मलेल्या ब्रूसने दाखवली जिद्द
हुशारी आणि खास तंत्रामुळे मिळवले कळपावर वर्चस्व

न्यूझीलंडमध्ये वरच्या चोचीशिवाय जन्मलेला ‘ब्रूस’ नावाचा केआ पोपट सध्या जगभर चर्चेचा विषय ठरत आहे. गंभीर शारीरिक कमतरता असूनही त्याने केवळ जगण्याची लढाई जिंकली नाही, तर आपल्या कळपाचा नेता बनण्याची किमया साधली आहे. आपल्या खास ‘बीक जॉस्टिंग’ तंत्रामुळे तो इतर पक्ष्यांवर सहज मात करतो. वैज्ञानिकांच्या संशोधनात त्याची बुद्धिमत्ता आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता अधोरेखित झाली आहे. ब्रूसची कहाणी ही निसर्गातील जिद्द, अनुकूलन आणि हुशारीचे अनोखे उदाहरण मानली जात आहे.


न्यूझीलंड : निसर्गामध्ये अनेक जीव आपल्या वैशिष्ट्यपूर्ण क्षमतांमुळे वेगळे ठरतात. त्यापैकीच एक म्हणजे ब्रूस नावाचा केआ पोपट. वरच्या चोचीशिवाय जन्मलेला हा पोपट आज आपल्या कळपाचा प्रमुख बनला असून त्याची कहाणी जगभरात चर्चिली जात आहे.

केआ पोपट हे त्यांच्या खोडकर स्वभावासाठी आणि बुद्धिमान वर्तनासाठी ओळखले जातात. न्यूझीलंडच्या डोंगराळ भागात आढळणारे हे पक्षी कारचे भाग, बूट आणि इतर वस्तूंशी खेळताना दिसतात. मात्र ब्रूसची ओळख त्याच्या वेगळ्या शारीरिक रचनेमुळे आणि त्यातून निर्माण झालेल्या अनोख्या कौशल्यांमुळे झाली आहे.

2013 मध्ये न्यूझीलंडच्या साउथ आयलंड पर्वतरांगांमध्ये ब्रूस आढळून आला होता. सुरुवातीला त्याला मादी समजण्यात आले होते, मात्र नंतरच्या चाचण्यांमध्ये तो नर असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याला क्राइस्टचर्च येथील विलोबँक वाइल्डलाइफ रिझर्व्हमध्ये आणण्यात आले. येथे त्याने केवळ स्वतःला सावरले नाही, तर आपल्या गटाचा ‘अल्फा’ नेता म्हणून स्थान निर्माण केले.

2026 मध्ये करंट बायोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, ब्रूसने इतर 12 केआ पोपटांशी झालेल्या संघर्षांमध्ये एकदाही पराभव स्वीकारला नाही. त्याने स्वतःचे खास ‘बीक जॉस्टिंग’ तंत्र विकसित केले आहे. आपल्या तीक्ष्ण खालच्या चोचीच्या साहाय्याने तो प्रतिस्पर्ध्यांना दूर ठेवतो आणि याच तंत्रामुळे तो सहज वर्चस्व राखतो.

वैज्ञानिकांच्या निरीक्षणात असेही आढळले की, ब्रूसचा तणाव पातळी इतर पक्ष्यांच्या तुलनेत कमी आहे. तो आपल्या शरीरातील मर्यादा ओलांडत दगड, खडक आणि कुंपणांचा वापर करून अन्न फोडतो तसेच पिसांची स्वच्छताही करतो. या कृतींमधून त्याची समस्या सोडवण्याची क्षमता स्पष्टपणे दिसून येते.

केआ पोपट सामान्यतः अत्यंत बुद्धिमान मानले जातात. लपवलेले खाद्य शोधणे, कोडी सोडवणे आणि विविध साधनांचा वापर करणे यासाठी ते प्रसिद्ध आहेत. मात्र ब्रूसने आपल्या अपंगत्वालाच ताकद बनवत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याची कहाणी निसर्गातील जिद्द आणि अनुकूलन क्षमतेचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.