नाल्यावरील मोडकळीस आलेल्या सिमेंट पोलवरून जीवघेणा प्रवास
सावंतवाडी । प्रतिनिधी :तालुक्यातील कोलगाव कुंभारवाडी येथील ग्रामस्थांना आणि शालेय विद्यार्थ्यांना आजही मूलभूत सुविधांच्या अभावामुळे जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून झिरंग ७ नंबर शाळा, मुख्य बाजारपेठ आणि सावंतवाडी शहरात जाण्यासाठी येथील नागरिक नाल्यावरील केवळ तीन सिमेंटच्या खांबांचा (पोल) आधार घेत आहेत. मात्र, यातील एक खांब आता पूर्णपणे मोडकळीस आला असून येथे केव्हाही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबतची सविस्तर माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी दिली असून, लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
कुंभारवाडीतून शहरात जाण्यासाठी हा मार्ग अत्यंत जवळचा आणि सोयीचा आहे. मात्र, या मार्गाच्या मध्यभागी एक मोठा नाला असल्याने तो पार करणे ग्रामस्थांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. विशेषतः पावसाळ्यात या ठिकाणची परिस्थिती अत्यंत भीषण असते. नाल्यावर कोणताही पक्का पूल नसल्याने केवळ तीन सिमेंटच्या पोलवरून विद्यार्थी, महिला आणि वृद्ध नागरिकांना कसरत करत ये-जा करावी लागते. सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे हे पोल आणि पायवाट अत्यंत निसरडी झाली आहे. आधारासाठी साधे रेलिंगही उपलब्ध नसल्याने चालताना पाय घसरून थेट खोल नाल्यात पडण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
अनेक वर्षांपासून या ठिकाणी कायमस्वरूपी पुलाची मागणी केली जात आहे, मात्र अद्यापही यावर ठोस कार्यवाही झालेली नाही. शालेय मुलांना शिक्षणासाठी याच धोकादायक मार्गाचा अवलंब करावा लागत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्येची दखल घेऊन तत्काळ या ठिकाणी संरक्षक रेलिंगसह पक्क्या पुलाची व्यवस्था करावी, जेणेकरून कुंभारवाडीतील ग्रामस्थांचा हा जीवघेणा प्रवास थांबेल, अशी आर्त हाक ग्रामस्थांकडून दिली जात आहे.













