सावंतवाडीतील सेंट्रल उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापक कक्षात बेकायदेशीर प्रवेश

शिवीगाळ व कामात अडथळा प्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

सावंतवाडी :
​सावंतवाडी येथील सेंट्रल उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापक कक्षात बेकायदेशीरपणे घुसून मुख्याध्यापकांना शिवीगाळ करत, कामात अडथळा आणल्याप्रकरणी मुंबई व सावंतवाडीतील एकूण सात जणांविरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी, १३ ऑक्टोबर रोजी दुपारी पावणेएक वाजेच्या सुमारास घडली.

​याबाबत पोलीस ठाण्यातून याबाबत सावंतवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुख्याध्यापक इकबाल दस्तगीर मुलानी (वय ५१, रा. दीप रेसिडेन्सी, सालईवाडा, सावंतवाडी) हे शाळेतील आपल्या मुख्याध्यापक कक्षात कामकाज करत होते. त्यावेळी संशयित रफीद्दीन मुतालिक शेख (वय ६५, रा. मुंबई), अश्फाक युसुफ शेख (वय ५४, रा. मुंबई), इफ्तिकार शाहिद शेख (वय ४५, रा. मुंबई), इफ्तिकार इम्तियाज राजगुरू (वय ४०, रा. सावंतवाडी), सलमान फारूक नाईक (वय ३५, रा. सावंतवाडी), जरीना मुबारक खान (वय ६५, रा. सावंतवाडी) आणि निषाद ईर्शान बुराण (वय ३५, रा. सावंतवाडी) यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता बेकायदेशीरपणे मुख्याध्यापक कक्षात प्रवेश केला.

​त्यानंतर आरोपींनी मुख्याध्यापक मुलानी यांना “तुला आम्ही निलंबित केलेले आहे, तुला नोकरी करू देणार नाही” असे म्हणत शिवीगाळ केली. या दरम्यान कक्षातील बोर्ड काढत असताना, तेथे उपस्थित असलेल्या सावंतवाडी जमात बॉम्बेच्या उपाध्यक्ष निलोफर बेग यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र संशयित आरोपींनी त्यांचे काहीही न ऐकता संशयित अश्फाक शेख याच्या सांगण्यावरून सलमान नाईक याने निलोफर बेग यांचा हात झटकून त्यांना बाजूला ढकलून दिले आणि कक्षातील बोर्ड काढून नुकसान केले.

​याप्रकरणी मुख्याध्यापक इकबाल मुलानी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सावंतवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या संबंधित कलमांनुसार सातही आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मगदूम, सहाय्यक पोलीस निरीक्षक हिंगे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार धुरी करत असून आरोपींच्या अटकेची तजवीज सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.