साखरपुड्याच्या घाईगडबडीत डल्ला; सव्वातीन लाखांचे दागिने लंपास

​सावंतवाडीतील कारीवडे येथील घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

​सावंतवाडी | प्रतिनिधी :
साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी आलेल्या एका महिलेच्या पर्समधून सुमारे ३ लाख ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची धक्कादायक घटना कारीवडे येथे घडली आहे. याप्रकरणी सौ. क्रांती सावंत (रा. नरडवे, कणकवली) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सावंतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​ याबाबत सावंतवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी क्रांती सावंत या १२ मे रोजी सकाळी १०:३० वाजता आपल्या पतीसह नरडवे येथून एका नातेवाईकाच्या साखरपुड्यासाठी निघाल्या होत्या. नरडवे ते कणकवली, त्यानंतर कणकवली ते सावंतवाडी आणि तिथून कारिवडे असा एसटी बसने प्रवास करून त्या कार्यक्रम स्थळी पोहोचल्या. त्यांच्याकडे असलेल्या पर्समध्ये एका डबीत सोन्याचे मंगळसूत्र, हार आणि अंगठ्या असा मौल्यवान ऐवज होता.

​ साखरपुड्याच्या घरात पोहचल्यानंतर त्यांनी आपली पर्स एका ठिकाणी ठेवली आणि त्या वॉशरूमला गेल्या. अवघ्या १० मिनिटांत त्या परत आल्या आणि त्यांनी पर्स तपासली असता, त्यातील दागिन्यांची डबी गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ तिथे उपस्थित असलेल्या लोकांकडे चौकशी केली आणि घरभर शोध घेतला, मात्र दागिने मिळून आले नाहीत.

​ साखरपुडा आटोपल्यानंतर सौ. सावंत आपल्या मुलासोबत घरी परतल्या. दागिने चुकून घरीच राहिले असावेत, या आशेने त्यांनी पूर्ण घराची झडती घेतली. मात्र, तिथेही दागिने न मिळाल्याने त्यांची खात्री पटली की चोरी कारीवडे येथेच झाली आहे. आज २३ मे रोजी त्यांनी पुन्हा एकदा घटनास्थळी जाऊन शोध घेतला, परंतु यश न आल्याने अखेर त्यांनी सावंतवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

​ चोरीला गेलेल्या दागिन्यांची एकूण किंमत ३ लाख ९० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास पोलीस हवालदार दीपक शिंदे हे करीत आहेत.

​सावधानता बाळगा: पोलिसांचे आवाहन
गर्दीच्या ठिकाणी किंवा मंगलकार्यात आपले दागिने आणि मौल्यवान वस्तूंची काळजी स्वतः घ्या, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.