कणकवली : तळेरे बस स्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलेच्या पर्समधील तब्बल ४ लाख ४२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्राची नारायण खांबल (वय ४८, रा. मातृछाया चाळ, गोराई नं. २, बोरिवली पश्चिम, मुंबई, मुळ रा. अरुळे कर्फेवाडी, ता. वैभववाडी) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राची खांबल या पती नारायण खांबल व मुलगी धनश्री यांच्यासह ७ मे रोजी मुंबईहून मूळ गावी अरुळे येथे आल्या होत्या. १२ मे रोजी त्यांच्या भावाच्या मुलीचे लग्न शिरगाव (ता. देवगड) येथे असल्याने त्या लग्नासाठी निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी एका पर्समध्ये सोन्याचे दागिने ठेवलेला प्लास्टिकचा डबा ठेवून पर्सची चैन बंद केली होती. कपड्यांची एक बॅग व दागिन्यांची पर्स घेऊन त्या दुपारी सुमारे १२.१५ वाजता तळेरे बस स्थानकात पोहोचल्या.
सुमारे १२.३५ वाजण्याच्या सुमारास कणकवलीकडे जाणारी एस.टी. बस तळेरे येथे आली. बसमध्ये चढण्यासाठी मोठी गर्दी झाल्याने त्या नांदगावपर्यंत जाण्यासाठी बसमध्ये चढल्या. बस सुटल्यानंतर तिकीट काढण्यासाठी त्यांनी पर्स उघडली असता पर्सची चैन उघडी असल्याचे निदर्शनास आले. पर्समधील सोन्याचे दागिने ठेवलेला प्लास्टिकचा डबा गायब असल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ पतींना फोन करून माहिती दिली. त्यानंतर त्या नांदगाव येथे उतरून पुन्हा तळेरे येथे आल्या.
प्राची खांबल व त्यांचे पती यांनी तळेरे बस स्थानक परिसरात दागिन्यांचा शोध घेतला, मात्र ते मिळून आले नाहीत. अखेर गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने पर्समधील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.
चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन वाट्या असलेले मंगळसूत्र किंमत २ लाख ७० हजार रुपये, १० ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार किंमत ९० हजार रुपये, ४ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या कुड्यांचा जोड किंमत ३५ हजार रुपये, ५ ग्रॅम वजनाच्या कानातील सोन्याच्या चैनचा जोड किंमत ४० हजार रुपये तसेच सोन्याची तार व मोत्याचे मणी गुंफलेली नथ किंमत ७ हजार रुपये असा एकूण ४ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. याप्रकरणी कणकवली पोलीस अधिक तपास करत आहेत.













