दोडामार्ग | प्रतिनिधी
तिलारी-दोडामार्ग रस्त्यावरील कुडासे तिठा येथे गुरुवारी एका मद्यधुंद जेसीपी चालकाच्या बेजबाबदारपणामुळे भीषण अपघाताची घटना घडता घडता राहिली. अचानक लावलेल्या ब्रेकमुळे दोन दुचाकीवरील चार जण जेसीपीच्या चाकाखाली येण्यापासून सुदैवाने बचावले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
दोडामार्ग हुन तिलारी कडे जाणाऱ्या KA 29 N 2028 क्रमांकाचा जेसीपी दोडामार्गहून तिलारीच्या दिशेने जात होता. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार, चालक पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत होता आणि त्याचे वाहनावर कोणतेही नियंत्रण नव्हते. कुडासे तिठा येथे पोहोचताच त्याने अचानक जोरात ब्रेक दाबले.
यावेळी जेसीपीच्या पाठीमागून येणाऱ्या दोन दुचाकीस्वारांची मोठी तारांबळ उडाली. वेग जास्त असल्याने दोन्ही दुचाकी जेसीपीला धडकून रस्त्यावर फेकले गेले. सुदैवाने, वेळीच सावरल्याने हे चारही जण जेसीपीच्या अवाढव्य चाकाखाली चिरडले जाण्यापासून थोडक्यात वाचले.
चालक अल्पवयीन असल्याची चर्चा
धक्कादायक बाब म्हणजे, अपघात घडल्यानंतर सदर चालक स्वतःला ‘मालक’ असल्याचे भासवत होता, मात्र तो अल्पवयीन असल्याचे समोर येत आहे. पोलीस घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच चालक तेथून फरार झाला.त्याचा तपास सुरु आहे
तिलारी-दोडामार्ग मार्गावर अवजड वाहनांची वर्दळ नेहमीच असते. अनेकदा हे चालक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून बेधुंदपणे गाड्या चालवतात, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. या घटनेनंतर कुडासे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.
घटना स्थळी पोलीस राजेश गवस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून फरार चालकाचा शोध घेतला जात आहे.
अशा बेजबाबदार आणि अल्पवयीन चालकांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.












