राजापूरमध्ये २० हजारांची लाच घेताना कोतवाल, मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

राजापूर, प्रतिनिधी सातबारावर पत्नीचे नाव दाखल करण्यासाठी २५ हजारांची लाच मागून तडजोडीअंती २० हजार रुपये स्वीकारताना राजापूर तालुक्यातील दोन महिला अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

तक्रारदाराची मौजे जवळेथर येथे वडिलोपार्जित जमीन आहे. सातबारा उताऱ्यावर पत्नीचे नाव नसल्याने त्यांनी फेरफारसाठी अर्ज केला होता. याबाबत १३/०५/२०२६ रोजी मिळंद येथील तलाठी कार्यालयात कोतवाल संजना नंदकुमार माने (वय ४१) यांची भेट घेतली असता, फेरफार मंजूर करण्यासाठी मंडळ अधिकारी पुनम जससिंग गावीत (वय ३७) यांनी २५,०००/- रुपये मागितल्याचे सांगून कोतवाल माने यांनी तक्रारदाराकडे पैशांची मागणी केली.

सापळा यशस्वी

तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर १४/०५/२०२६ रोजी पडताळणी करण्यात आली. त्यात कोतवाल माने यांनी मंडळ अधिकारी गावीत यांच्यासाठी २०,०००/- रुपये लाच मागून ती स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार सापळा रचण्यात आला.

मिळंद तलाठी कार्यालयात पंचासमक्ष कोतवाल संजना माने यांनी २०,०००/- रुपये स्वीकारले. त्यानंतर आरोपी क्र. २ मंडळ अधिकारी पुनम गावीत यांना फोनवरून याबाबत कळवताच त्यांनी संमती दर्शवली. त्यामुळे दोघींनाही एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले.

कोणावर कारवाई

1. श्रीमती संजना नंदकुमार माने : कोतवाल, तलाठी सजा मिळंद, ता. राजापूर (वर्ग-४)

2. श्रीमती पुनम जससिंग गावीत: मंडळ अधिकारी, तळवडे ता. राजापूर (वर्ग-३)

कारवाई करणारे पथक

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी युनिटचे पोलीस उप अधीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, सुहास रोकडे, सपोफौ उदय चांदणे, पोहवा विशाल नलावडे, दिपक आंबेकर, पो.कॉ. हेमंत पवार, राजेश गावकर, मपो.कॉ. वैशाली धनवडे, समिता क्षिरसागर व चालक पोहवा प्रशांत कांबळे यांनी केली. राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.