दापोली: ट्रॅक्टर उलटून भीषण अपघात; चालक जागीच ठार, दोघे गंभीर जखमी

दापोली:
रस्त्याचे काम सुरू असताना चालकाचे नियंत्रण सुटून ट्रॅक्टर उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू झाला असून, ट्रॅक्टरवर बसलेले अन्य दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना दापोली तालुक्यातील भोईवाडी ते फरारे जंगलजेटी दरम्यानच्या रस्त्यावर ११ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.
विनापरवाना ट्रॅक्टर चालवणे बेतले जीवावर
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील बंधन बडाईक (वय २८ वर्षे, मूळ रा. झारखंड, सध्या रा. दस्तुरी, खेड) हा ट्रॅक्टर (क्र. MH-17-V-496) भोईवाडी ते फरारे जंगलजेटीच्या दिशेने घेऊन जात होता. सुनीलकडे ट्रॅक्टर चालवण्याचा कोणताही परवाना किंवा तांत्रिक ज्ञान नव्हते. उताराच्या रस्त्यावर ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर उलटला. या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने चालक सुनील बडाईक याचा जागीच मृत्यू झाला.
सहप्रवासी गंभीर जखमी
ट्रॅक्टरवर चालकाच्या बाजूला बसलेले दोन कामगार या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत:
• सोनाली (शानाबाई) तुकाराम चव्हाण (वय ४० वर्षे): यांच्या डोक्याला, पायाला, कंबरेला आणि मांडीला गंभीर इजा झाली आहे.
• संतोष दत्तू चौगले (वय ४१ वर्षे): हे देखील या अपघातात जखमी झाले आहेत.
पोलीस तपास आणि गुन्हा दाखल
दापोली पोलीस ठाण्याचे कर्मचारी अभिजित रामचंद्र पवार यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. तपासाअंती आणि साक्षीदारांच्या जबाबावरून, मृताने निष्काळजीपणे आणि विनापरवाना वाहन चालवून स्वतःच्या मरणास व इतरांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ९६/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता (BNS) कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.