प. पू. राऊळ महाराज समाधी परिसराचा विकास ही आमची जबाबदारी: पालकमंत्री नितेश राणे

धार्मिक पर्यटन स्थळ विकास निधीमधील कामांचे पिंगुळीत लोकार्पण

बाईमा यांना अभिवादन

कुडाळ (प्रतिनिधी ) : प. पू. समर्थ सद्गुरु राऊळ महाराज यांचा आशीर्वाद राणे कुटुंबीयांवर आहे. त्यामुळे त्यांच्या या समाधी मंदिराच्या परिसराचा विकास करण्याची जबाबदारी आमची आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी पिंगुळी येथील कार्यक्रमात केले. यावेळी त्यांनी प. पू. सद्गुरु राऊळ महाराज व प. पू. अण्णा राऊळ महाराज यांच्या समाधी मंदिराचे दर्शन घेतले तसेच अमृत महोत्सवी वाटचाल करणाऱ्या बाईमा यांना नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले.

प. पू. अण्णा राऊळ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त व बाईमा यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त प. पू. सद्गुरु राऊळ महाराज मठामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तसेच धार्मिक पर्यटन स्थळ विकास निधी मधून झालेल्या विकास कामांचे लोकार्पणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे उपस्थित होते त्यांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ झाला त्यांनी प. पू. सद्गुरु राऊळ महाराज व प. पू. अण्णा राऊळ महाराज यांच्या समाधी चे दर्शन घेतले तसेच बाई मा यांना अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन आशीर्वाद घेतले यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, तहसीलदार सचिन पाटील, तालुका अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, राजू राऊळ, बंड्या सावंत, जिल्हा परिषद सदस्य आरती पाटील, पंचायत समिती सदस्य मंगेश प्रभू, सौ. घावनळकर, संस्थांचे दशरथ राऊळ, विठोबा राऊळ तसेच आदी मान्यवर, भक्तगण उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, आम्हा राणे कुटुंबीयांवर प. पू. राऊळ महाराज यांचा आशीर्वाद आहे जेव्हा या मतदारसंघातून मी सुरुवात करायचे ठरवले होते त्यावेळी प. पू. राऊळ महाराज यांचा आशीर्वाद घेऊन पुढे गेलो होतो. आम्हा कुटुंबीयांचे हे श्रद्धास्थान आहे त्यामुळे या परिसराचा विकास करण्याची जबाबदारी आमची आहे. यापुढे तुम्ही कोणतेही काम सांगितले तरी ते तात्काळ केले जाईल असे त्यांनी सांगून आज होणाऱ्या या कार्यक्रमाबद्दल आमच्या आईने सांगितले होते की कुटुंबातील एकाने तरी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवा. असे त्यांनी सांगितले आणि बाई मा यांना शुभेच्छा देऊन आशीर्वाद घेतले.

यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.