भक्तिरसात न्हाऊन निघाले श्री क्षेत्र पिंगुळी;

सदगुरु समर्थ प. पू.अण्णा महाराज स्मृतिदिन व बाईमांचा अमृत महोत्सव उत्साहात संपन्न

हजारो भक्तांच्या उपस्थितीत धार्मिक, सांस्कृतिक व सेवाभावी उपक्रमांची पर्वणी

स्वप्निल कदम -कुडाळ

श्री क्षेत्र पिंगळी येथे सदगुरु समर्थ प. पू. अण्णा महाराज यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त तसेच संगीता विनायक राऊळ (बाईमा) यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य भक्तिमय महोत्सव हजारो भक्तांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. दोन दिवस चाललेल्या या सोहळ्यामुळे संपूर्ण पिंगुळी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली होती.

या महोत्सवाची सुरुवात शुक्रवार, दि. १५ मे रोजी सायंकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांनी झाली. सायंकाळी पाच वाजता श्री दत्त संगीत भजनी मंडळ, बच्चे सावर्डे (जि. कोल्हापूर) यांच्या सुश्राव्य भजनाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले. त्यानंतर नित्य सांज आरती संपन्न झाली. तसेच राऊळ महाराज भक्त मंडळ, मुंबई यांच्या वतीने “अमृत वंदना” हा सांस्कृतिक नृत्याविष्कार सादर करण्यात आला.

शनिवारी पहाटे काकड आरती, श्री राउळ महाराज समाधी पूजन व अभिषेक संपन्न झाले. तसेच प. पू विनायक अण्णा महाराज समाधी स्थळी लघुरुद्र विधी पार पडला. सकाळी दहा वाजता संस्थान व रोटरी कल्याण मंडळ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते. मॅग्नेटिक अनालायझर मशीनद्वारे संपूर्ण शरीर तपासणी तसेच मोफत रक्त तपासणी करण्यात आली. या शिबिरास भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

बाईमा यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त शास्त्रोक्त मंत्रोच्चारात पाद्यपूजन करण्यात आले. त्यानंतर तुलाभार सोहळाही मोठ्या भक्तिभावात पार पडला. श्री दत्त मंदिर ते राऊळ महाराज मठ दरम्यान बाईमा यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत श्री दत्त संगीत भजनी मंडळ, सावर्डे यांच्या भजनाने वातावरण भक्तिमय झाले होते.
दुपारी महाआरतीनंतर सर्व उपस्थित भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्री समर्थ राऊळ महाराज भक्त मंडळ, आजरा पंचक्रोशी यांच्या दिंडी कार्यक्रमाने वातावरण दुमदुमून गेले. त्यानंतर श्री भगवती दिंडी भजन मंडळ, कोटकमते तसेच सद्गुरु दिंडी भजन मंडळ, कुडाळ यांच्या सुश्राव्य भजनांनी भक्तांना मंत्रमुग्ध केले.

सायंकाळी जीवनविद्या मिशन परिवार व श्री नामदेव महाराज भक्त मंडळ, सिंधुदुर्ग यांच्या वतीने नामस्मरण कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर नित्य सांज आरती पार पडली .

या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त राऊळ महाराज समाधी तसेच अण्णा महाराज समाधी स्थळी फुले व फळांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. संपूर्ण परिसर भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाने भारावून गेला होता. हजारो भक्तभाविकांनी उपस्थित राहून या पवित्र सोहळ्याचा लाभ घेतला.