पश्चिम आशियातील तणावादरम्यान LPG टँकर सुरक्षितपणे कांडला बंदरात दाखल

पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कतारहून निघालेला MV SYMI हा एलपीजी टँकर सुरक्षितपणे गुजरातमधील कांडला बंदरात दाखल झाला आहे. या जहाजाने होर्मुझची सामुद्रधुनी पार करत 20 हजार मेट्रिक टन एलपीजी भारतात आणला. इराण-इस्रायल संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम होत असताना हा प्रवास महत्त्वाचा मानला जात आहे. मार्चपासून भारताच्या ध्वजांकित 13 जहाजांनी या संवेदनशील समुद्री मार्गाचा वापर केला आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने व्यावसायिक जहाजांवरील हल्ल्यांचा तीव्र निषेध नोंदवला आहे.


होर्मुझ सामुद्रधुनी पार करून LPG टँकर भारतात

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान मार्शल बेटांचा ध्वज असलेले MV SYMI हे जहाज सुरक्षितपणे गुजरातमधील दीनदयाल बंदर प्राधिकरण, कांडला येथे पोहोचले. या जहाजामध्ये सुमारे 20,000 मेट्रिक टन एलपीजीचा साठा होता. कतारमधून प्रवास सुरू केलेल्या या जहाजाने 13 मे रोजी होर्मुझची सामुद्रधुनी पार केली आणि 16 मे रोजी रात्री बंदरात दाखल झाले.

मार्चच्या सुरुवातीपासून भारताच्या ध्वजांकित 13 जहाजांनी या सामुद्रधुनीतून प्रवास केला आहे. यात 12 एलपीजी टँकर आणि एका कच्च्या तेलाच्या टँकरचा समावेश आहे. जगातील जवळपास 20 टक्के ऊर्जा पुरवठा या अरुंद समुद्री मार्गातून होतो, त्यामुळे या मार्गावरील सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

इराण-इस्रायल संघर्षामुळे ऊर्जा संकटाची भीती

इराण-इस्रायल संघर्ष आणि अमेरिकेच्या कारवाईमुळे पश्चिम आशियात तणाव वाढला आहे. या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अलिकडच्या काळातील हे सर्वात मोठ्या ऊर्जा संकटांपैकी एक ठरू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या विशेष बैठकीत भारताने व्यावसायिक जहाजांवरील हल्ले आणि नेव्हिगेशन स्वातंत्र्यातील अडथळ्यांचा निषेध केला. UN मधील भारताचे स्थायी प्रतिनिधी पार्वथनेनी हरीश यांनी अशा घटनांना “अस्वीकार्य” म्हटले आहे. 13 मे रोजी ओमान किनाऱ्याजवळ भारताच्या ध्वजांकित जहाजावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली होती. या जहाजावरील 14 कर्मचाऱ्यांची सुरक्षित सुटका करण्यात आली.