ओडेसाजवळ व्यापारी जहाजावर हल्ला; 4 भारतीय जहाजावर असल्याने भारताची तातडीची कारवाई

# MEA ने युक्रेनच्या राजदूताला समन्स बजावले

युक्रेनमधील ओडेसा बंदराजवळ व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेतली आहे. या जहाजावर चार भारतीय नागरिक कार्यरत असल्याची माहिती समोर आल्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (MEA) युक्रेनचे राजदूत डॉ. ऑलेक्झांडर पॉलिशचुक यांना तातडीने बोलावून घेतले. चार भारतीयांपैकी दोघे सुरक्षित असल्याची माहिती मिळाली असून उर्वरित दोघांबाबत अद्याप स्पष्ट माहिती उपलब्ध झालेली नाही. यापूर्वीही अशाच हल्ल्यात चार भारतीयांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर भारताने भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.


भारतीय खलाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

नवी दिल्ली : युक्रेनमधील ओडेसा बंदराजवळ व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (MEA) सोमवारी युक्रेनचे भारतातील राजदूत डॉ. ऑलेक्झांडर पॉलिशचुक यांना समन्स बजावून स्पष्टीकरण मागितले. काळ्या समुद्रातील बिघडलेल्या सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे.

युक्रेनमधील भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यापारी जहाजावर चार भारतीय नागरिक कार्यरत होते. त्यापैकी दोघे सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, उर्वरित दोघांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. त्यांच्या सुरक्षिततेबाबत भारतीय यंत्रणा सातत्याने संपर्कात असल्याचे सांगण्यात आले आहे.

यापूर्वी 19 जुलै रोजी एमव्ही गोल्डन लिओ या व्यापारी जहाजावर ओडेसा परिसरात झालेल्या हल्ल्यात चार भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर एक भारतीय गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान, युक्रेनच्या परराष्ट्र मंत्री आंद्री सिबिहा यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांना पत्र पाठवून मृत भारतीय खलाशांबद्दल शोक व्यक्त केला आहे. युक्रेनच्या दूतावासाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात मृतांच्या कुटुंबीयांप्रती गंभीर संवेदना व्यक्त करण्यात आल्या असून, या घटनेसाठी काळ्या समुद्रातील बिघडलेली सुरक्षा परिस्थिती कारणीभूत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

युक्रेनच्या निवेदनानुसार, सिबिहा आणि डॉ. एस. जयशंकर यांच्यात लवकरच दूरध्वनीवर चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या चर्चेत काळ्या समुद्रातील सुरक्षा परिस्थिती तसेच भारतीय खलाशांच्या सुरक्षेसंदर्भातील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.

प्रहार डिजिटलला उपलब्ध माहितीनुसार, भारत सरकार या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून असून संबंधित भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक राजनैतिक पावले उचलत आहे.