​आंबोलीत कारवर कोसळले झाड : सुदैवाने जीवितहानी टळली

वनविभाग व पोलिसांच्या तत्परतेमुळे वाहतूक सुरळीत
​
आंबोली । प्रतिनिधी : बांदा-संकेश्वर मार्गावरील आंबोली फणसवाडी येथे आज सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास एक मोठी दुर्घटना घडली. एका धावत्या कारवर रस्त्यालगतचे महाकाय झाड अचानक कोसळले. या भीषण अपघातात कारचे प्रचंड नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कारमधील सर्व प्रवासी सुखरूप असून मोठी जीवितहानी टळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी ५:१५ वाजण्याच्या सुमारास ‘जीजे-१५-सीपी-५७७८’ (GJ-15-CP-5778) या क्रमांकाची कार आंबोली फणसवाडी परिसरातून जात असताना रस्त्याशेजारील एक मोठे झाड अचानक कारवर आणि थेट मुख्य रस्त्यावर कोसळले. झाड पडल्यामुळे बांदा-संकेश्वर मार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी पूर्णपणे ठप्प झाली. ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्यामुळे काही क्षणांतच रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली.

​पोलिस आणि वन विभागाची तत्परता
घटनेचे गांभीर्य ओळखून आंबोली दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार मनीष शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी त्यांनी तातडीने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण केले. यानंतर पोलीस, वन विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येत युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. कटरच्या साहाय्याने झाडाच्या फांद्या तोडून आणि बाजूला करून रस्ता मोकळा करण्यात आला. झाड हटवल्यानंतर या मार्गावरील रखडलेली वाहतूक पूर्ववत करण्यात पोलिसांना यश आले असून सध्या येथील वाहतूक सुरळीत सुरू आहे. ऐन अडचणीच्या वेळी पोलिसांनी दाखवलेली गतिशीलता आणि तत्परतेमुळे प्रवाशांचा मोठा मनस्ताप टळला. याबद्दल वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून पोलीस प्रशासनाचे कौतुक होत आहे.