नागझरी नदीत बुडून एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू; धामणंद परिसरात शोककळा

खेड (प्रतिनिधी) :खेड तालुक्यातील धामणंद काजूफाटा येथील नागझरी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी घडली. या घटनेत एका १५ वर्षीय मुलीसह गुहागर तालुक्यातील दोघांचा मृत्यू झाला असून, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृतांमध्ये लावण्या विजय पार्टे (वय १५, रा. साखर चौकीचीवाडी, ता. खेड), नितीन सूर्यकांत जाधव (वय ३८, रा. गिमवी, ता. गुहागर) आणि विराज किशोर जाधव (वय १२, रा. गिमवी, ता. गुहागर) यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार दि. १८ मे २०२६ रोजी दुपारी साडेतीन ते सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हे तिघे धामणंद काजूफाटा परिसरातील नागझरी नदीच्या डोहात पोहण्यासाठी गेले होते. मात्र, नदीच्या पात्रातील पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अचूक अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले. काही वेळातच ही घटना परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आली. स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले, मात्र तोपर्यंत तिघांचाही मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी अरुण गोपाळ पार्टे यांनी खेड पोलीस ठाण्यात खबर दिली असून, पोलिसांनी अकस्मात मृत्यू क्रमांक ३७/२०२६ प्रमाणे बी.एन.एस.एस. कलम १९४ अंतर्गत नोंद केली आहे. पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे धामणंद, साखर चौकीचीवाडी आणि गिमवी परिसरात शोककळा पसरली असून, मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.