खेड (प्रतिनिधी) – खेडमधील रोटरी क्लब ऑफ खेडच्या २०२६-२७ या रोटरी वर्षासाठी नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न झाला. रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल, खेड येथे रविवारी ३० ऑगस्ट रोजी हा सोहळा पार पडला.
रोटरी क्लब ऑफ खेडच्या अध्यक्षपदाची सूत्रे रो. डॉ. रियाझ मुल्ला यांनी स्वीकारली. तर रो. सुयोग बेडेकर यांनी सचिवपदाची आणि रो. जय करुणाकरन यांनी खजिनदारपदाची जबाबदारी स्वीकारली. यावेळी नवनिर्वाचित संचालक मंडळातील पदाधिकाऱ्यांचाही पदग्रहण सोहळा पार पडला.
रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे क्लब को-ऑर्डिनेशन सेक्रेटरी रो. प्रणय तेली यांनी इंस्टॉलेशन ऑफिसर म्हणून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पदाची शपथ देत त्यांच्या हाती जबाबदारी सोपवली.
या कार्यक्रमाला रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे असिस्टंट गव्हर्नर रो. अविनाश पालशेतकर, रोटरी क्लब ऑफ खेडचे चार्टर्ड अध्यक्ष रो. बिपिनदादा पाटणे तसेच रोटरी प्रतिष्ठान, खेडचे अध्यक्ष रो. डॉ. उपेंद्र तलाठी यांची प्रमुख उपस्थिती होती.
माजी अध्यक्ष रो. मंदार संसारे आणि सचिव रो. ॲड. मिलिंद जाडकर यांनी आपल्या कार्यकाळात राबविलेल्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि सेवाभावी उपक्रमांचा आढावा घेत नूतन कार्यकारिणीकडे क्लबची सूत्रे सोपवली.
अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर डॉ. रियाझ मुल्ला यांनी शिक्षण, आरोग्य, सामाजिक विकास आणि गरजू घटकांना मदत यासह विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून खेड परिसराच्या विकासासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.
‘स्वतःसाठी नव्हे, तर समाजासाठी’ या सेवाभावी भावनेतून रोटरी क्लबच्या सेवाकार्याचा वारसा पुढे नेत आगामी वर्षात नव्या ऊर्जेने आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा निर्धार नूतन कार्यकारिणीने व्यक्त केला.
उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.













