खेड (प्रतिनिधी) : गेली अनेक वर्षे वावे हॉस्पिटल ते पिंपळवाडी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने ज्येष्ठ नागरिक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रकाश लक्ष्मण पालांडे यांनी दि. १९ मे २०२६ पासून खेड तहसील कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. खराब रस्त्यांमुळे ग्रामस्थ, विद्यार्थी, महिला आणि वरिष्ठ नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत असून प्रशासन मात्र केवळ आश्वासनांची खैरात करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
प्रकाश पालांडे यांनी सांगितले की, या रस्त्याच्या डांबरीकरण व डागडुजीसाठी त्यांनी ५ नोव्हेंबर २०२५ रोजी विभागीय आयुक्तांकडे लेखी पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर डिसेंबर २०२५ मध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने वृत्तपत्रांमधून या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असल्याचे नमूद करत या मार्गावरील एसटी वाहतूक बंद करण्याचा इशारा दिला होता. तसेच ३ मार्च २०२६ रोजी एसटी महामंडळाने ग्रामपंचायतीलाही पत्र पाठवून रस्त्याच्या दुरावस्थेमुळे भविष्यात या मार्गावरील बससेवा बंद होण्याची शक्यता व्यक्त केली होती.
या सर्व घडामोडींनंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याचा आरोप पालांडे यांनी केला. “मी सातत्याने विविध कार्यालयांशी संपर्क साधत पत्रव्यवहार करत होतो, मात्र प्रशासनाने त्याची कोणतीही दखल घेतली नाही,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, ४ एप्रिल रोजी त्यांनी उपोषणाचा इशारा देत प्रशासनाला पत्र दिले होते. त्यावेळी प्रशासनाकडून उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली होती. “रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव नियोजन समितीकडे पाठवला आहे,” असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर पालांडे यांनी उपोषण तात्पुरते स्थगित केले होते. त्यानंतर ३० एप्रिल रोजी त्यांनी आयुक्त अगरवाल मॅडम यांची भेट घेऊन रस्त्याच्या समस्येबाबत चर्चा केली होती. यावेळी “दोन दिवसांत सीईओंना सांगून रस्त्याची डागडुजी करून देऊ,” असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात कोणतीही कामे सुरू झाली नाहीत.
यानंतर पालांडे यांनी पुन्हा प्रशासनाला पत्र देत पावसाळ्यापूर्वी रस्त्यावरील खड्डे न भरल्यास १९ मे रोजी आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. प्रशासनाकडून त्यांना पुन्हा उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली. त्यामध्ये दुरुस्तीचा प्रस्ताव नियोजन समितीकडे पाठविल्याचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र केवळ प्रस्ताव आणि आश्वासनांवर नागरिकांचे प्रश्न सुटणार नाहीत, असे सांगत त्यांनी अखेर उपोषण सुरू केले.
“गावातील नागरिकांच्या मूलभूत गरजाच प्रशासन पूर्ण करू शकत नसेल तर त्यांनी जगायचे कसे?” असा संतप्त सवाल यावेळी पालांडे यांनी उपस्थित केला. खराब रस्त्यांमुळे भविष्यात एसटी सेवा बंद झाल्यास विद्यार्थी, रुग्ण, महिला आणि वरिष्ठ नागरिकांचे मोठे हाल होणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
यावेळी त्यांनी स्थानिक आमदार भास्कर जाधव यांच्याशीही अनेकदा संपर्क साधून पत्रव्यवहार केल्याचे सांगितले. मात्र त्यांच्या स्तरावरून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, या उपोषणामुळे तालुक्यातील रस्त्यांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.













