खेड – प्रतिनिधी
दिनांक १३ ते १६ ऑक्टोबर २०२५ दरम्यान क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मान्यतेने आयोजित राज्यस्तरीय शालेय तायक्वॉंडो चॅम्पियनशिप स्पर्धा संभाजीनगर येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल, खेड येथील विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत ३ रौप्य पदके पटकावून शाळेचा गौरव वाढवला.
या स्पर्धेत अमरावती, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, नागपूर आणि लातूर या ८ विभागांमधील ५०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. तीव्र चुरशीच्या या स्पर्धेत रोटरी स्कूलच्या कु. ईश्वरी गोरे, कु. विधी गोरे आणि कु. रुद्र शिगवण यांनी उत्कृष्ट कामगिरी करून प्रत्येकी रौप्य पदकाची कमाई केली.
यापूर्वी झालेल्या तालुका, जिल्हा व विभागीय स्तरावरील तायक्वॉंडो स्पर्धांमध्ये या तिन्ही खेळाडूंनी सुवर्ण पदके मिळवत राज्यस्तरासाठी पात्रता मिळवली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे व कठोर प्रशिक्षणामुळे त्यांनी राज्यस्तरावरही चमकदार यश संपादन केले. या यशामागे क्रीडाशिक्षक व तायक्वॉंडो प्रशिक्षक श्री. कृणाल चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे चेअरमन मा. श्री. बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, तसेच शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. खेळाडूंच्या यशाबद्दल संपूर्ण खेड तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.












